लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:37 IST2020-06-15T21:34:37+5:302020-06-15T21:37:31+5:30
सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई असूनही नागरिकांनी त्रास सहन केला. दोन दिवसाच्या पावसात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. आयुक्त फोन उचलत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाचे कारण पुढे करून २० जूनला होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी निगम सचिवांनी महापौर कार्यालयाला पाठविलेल्या पत्रातून दिली. यामुळे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात सभागृह झाले नाही. प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता येत नाही. राज्यातील काही महापालिकांच्या सभा झाल्या. मग नागपूर मनपाची सभा का नाही. प्रशासनाला असाच कारभार करावयाचा असेल तर मनपा बरखास्त करून नगरसेवकांना घरी बसवावे, अशा शब्दात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाची भूमिका लोकशाहीला घातक
मनपाची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली. गेल्या चार महिन्यात सर्वसाधारण सभा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, पावसाळ्यातील उपाययोजना, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, अर्धवट कामे मार्गी लागावीत, नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी २० जूनला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कोरोना संसर्गाचा विचार करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी सुरेश भट सभागृहात ही सभा घेतली जाणार आहे. असे असूनही मनपा प्रशासनाची सभा रद्द करण्याची भूमिका लोकशाहीला घातक आहे.
संदीप जाधव, सत्तापक्ष नेता, मनपा
...तर मनपाच बरखास्त करा!
शासन दिशानिर्देशांचे पालन करून मनपाची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून सभा रद्द होत असेल, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोणतीही कामे करता येत नसतील तर मनपाच बरखास्त करा, मनपा आयुक्तांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपा
नागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?
प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक प्रशासनाकडे मनपा प्रशासनाकडे मांडतात. परंतु मागील चार महिन्यापासून नगरसेवकांचे फोन उचलले जात नाही. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. दुसरीकडे नागरिकांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात सभागृह रद्द होत असेल तर नगरसेवक तक्रारी कुणाकडे करणार?
दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस