यंदा नाटक नकोच, तालीम पुढच्या सीझनमध्येच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:26+5:302020-12-02T04:07:26+5:30
नागपूर : सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाले असले तरी संसर्गाचा प्रकोप कमी झालेला नाही. त्यामुळे, अनलॉकच्या निर्णयाला महिना उलटत असला ...

यंदा नाटक नकोच, तालीम पुढच्या सीझनमध्येच!
नागपूर : सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाले असले तरी संसर्गाचा प्रकोप कमी झालेला नाही. त्यामुळे, अनलॉकच्या निर्णयाला महिना उलटत असला तरी जाहीर कार्यक्रमांच्या बाबतीत म्हणावा तसा उत्साह दिसून येत नाही. त्यातच झाडीपट्टी रंगभूमीवर वाढत असलेला संसर्ग बघता कलावंतांनी यंदा नाटक नकोच, अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. बरेच प्रमुख कलावंत जाहीररीत्या हे सांगत सुटले आहेत.
यंदा झाडीपट्टी रंगभूमीचा सीझन होईल की नाही, असा संभ्रम असतानाच शासनाने सांस्कृतिक क्षेत्रावरील टाळेबंदी काही मर्यादांसह सैल केली. भाऊबीजेपासून अपेक्षेपेक्षा अत्यंत कमीच असले तरी एक-दोन बुकिंग मिळाल्या. मात्र, या बुकिंगमध्ये सादर झालेल्या नाट्यप्रयाेगांना उसळलेली तुफान गर्दी बघता आणि कुठल्याच नियमांचे पालन होत नसल्याचे दिसताच आरोग्य केंद्र व पोलिसांनीही हात टेकले. या दोन्ही यंत्रणांकडून आयोजक मंडळे व नाट्यसंघांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, जबाबदार शासकीय यंत्रणेकडे नाट्यप्रयोगांना परवानगी न देण्याची विनवणी करण्यात आली आहे. त्यातच रविवारी झाडीपट्टी रंगभूमीवर कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यामुळे स्थिती आणखीनच किचकट झाली आहे. त्याचा परिणाम आता कलावंतांनीच यंदा नाट्यप्रयोग नकोच, तालीम पुढच्या सीझनसाठीच करू, असा थेट निर्णय जाहीर केला आहे.
* यंदा मी माझे ‘सोन्याचा पिंजरा’ हे नाटक घेऊन रसिकांच्या सेवेत सादर होणार होतो. १ डिसेंबरपासून बुकिंगही सुरू होणार होती. मात्र, प्रतिकूल परिस्थती बघता स्वत:सह माझे कलावंत आणि रसिक मायबापाच्या आरोग्याच्या काळजीपोटी यंदा माझे सर्व प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१-२२ च्या सीझनमध्येच रसिकांची भेट घेऊ.
- देवेंद्र लुट : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता
* नाटक ही आमची साधना आहे आणि आमचा रोजगारही आहे. मात्र, आमच्या फायद्यासाठी आमच्या प्रेमापोटी येणाऱ्या रसिकांना संकटात टाकू शकत नाही. त्यामुळे, आमंत्रणे बरीच असली तरी एकही प्रयोग घेतलेला नाही. यंदा नुकसान नक्कीच झाले आहे आणि होणारही आहे. मात्र, अशा संकटातूनही जगण्याचा मार्ग नाटकच शिकवते, हे लक्षात ठेवून आहोत.
- आसावरी तिडके, प्रख्यात अभिनेत्री
................