‘एआय’ची भीती नकाे, ते आत्मसात करा, संधीचे जग खुले हाेईल

By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2025 20:40 IST2025-09-15T20:38:25+5:302025-09-15T20:40:15+5:30

डॉ. अभय करंदीकर : व्हीएनआयटीचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

Don't be afraid of AI, embrace it, a world of opportunity will open up | ‘एआय’ची भीती नकाे, ते आत्मसात करा, संधीचे जग खुले हाेईल

Don't be afraid of AI, embrace it, a world of opportunity will open up

नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आल्यामुळे तरुणांमध्ये नोकऱ्या हिरावून जाण्याची भीती आहे. मात्र एआय, मशिन लर्निंग किंवा डाटा सायन्स हे जग बदलणारे तंत्रज्ञान आहे आणि औद्योगिक क्रांतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्रांतीनेही नोकरीच्या संधी हिरावण्यापेक्षा अधिक संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा अभियंते, शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे जगभरातील संधीची दालने खुली हाेतील, असे आवाहन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी केले.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) २३ वा दीक्षांत समारंभ साेमवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मदभूषी मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल, अधिष्ठाता प्रा. विलास कळमकर उपस्थित होते. यावेळी पदवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शेनय सिद्धेशविनय यांना सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अभय करंदीकर पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी सर्जनशीलतेचा पर्याय नाही; ती एक सक्षम करणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्यास, आधुनिक गोष्टी तयार करण्यास आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. परंतु ते तुमच्या सुज्ञपणावर अवलंबून आहे. या नवीन युगात तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर अनुकूलता, नीतिमत्ता आणि सर्जनशीलता महत्त्वाची आहे. यंत्रे नमुना तयार करू शकतात. परंतु निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यातच असल्याचे डॉ. करंदीकर म्हणाले. मदभूषी मदन गोपाल म्हणाले, यश पदांवर किंवा पदव्यांवरून मोजले जाणार नाही तर तुम्ही इतरांच्या जीवनात किती प्रभाव पाडता यावर अवलंबून असेल. सचोटी, सर्जनशीलता आणि करुणेने भारताची सेवा करा, असे आवाहन त्यांनी केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांच्या नेतृत्वात वाढ

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील होणारी प्रगती ही भारताचे भविष्य घडवणारी वास्तविकता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, ज्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारने महिला वैज्ञानिक योजना आणि परिवर्तनशील संस्थांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिलांना संशोधन आणि मार्गदर्शनाची संधी मिळाल्याचे डाॅ. करंदीकर म्हणाले.

१२२७ पदव्या प्रदान

व्हीएनआयटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात एकूण १२२७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ७० डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये २७१ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, १ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (संशोधनाद्वारे), विविध विज्ञान शाखांमध्ये ६३ मास्टर ऑफ सायन्स, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये ७६३ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि ५९ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्या समाविष्ट आहेत.

Web Title: Don't be afraid of AI, embrace it, a world of opportunity will open up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.