क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल, एटीएसने पकडली चाल
By योगेश पांडे | Updated: May 17, 2025 00:51 IST2025-05-17T00:50:22+5:302025-05-17T00:51:25+5:30
धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात वळवले जायचे पैसे : पैशांचा उपयोग देशविघातक कामांत?

क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल, एटीएसने पकडली चाल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : धार्मिक स्थळांजवळ क्यूआर कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा एटीएसच्या कर्मचाऱ्याने भंडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते. आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून ६५ लाखांहून अधिक रक्कम आली होती. याप्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे.
मोहम्मद एजाज अन्सारी मोहम्मद मुस्तकीन अन्सारी (नारी रोड, कामगार नगर) असे आरोपीचे नाव आहे. तो जेरे अहतमाम दारुल उलूम गौसिया इंजेजामिया या संस्थेचा सदस्य आहे. संबंधित संस्था नोंदणीकृत आहे. आरोपीने संस्थेच्या नावाने क्यूआर कोड बनविले होते व ते विविध ठिकाणी लावले होते. संबंधित बॅनरवर एका निर्माणाधीन इमारतीचे चित्रदेखील होते. या कोडच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात देणगी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. एटीएसच्या नागपूर युनिटमधील एका कर्मचाऱ्याला शंका आली व त्याने ५० रुपये क्यूआर कोड स्कॅन करून पाठविले. संबंधित रक्कम ही संस्थेच्या खात्यावर जमा न होता स्टार कॉम्प्युटर सोल्युशन्सच्या खात्यावर जमा झाली. संबंधित कंपनी ही आरोपीचीच आहे. संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यात मागील दोन वर्षांत ६८.५९ लाख रुपये हे विविध संस्था व वेगवेगळ्या खात्यांतून जमा झाल्याचे दिसून आले. हा गैरप्रकार समोर आल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अन्सारीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१४, ३१६ व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुठून येत होते फंड?
अन्सारीच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम कुठून आली याचा तपास सुरू आहे. या पैशांचा उपयोग देशविघातक कृत्यांसाठी केला जात होता किंवा यातून मनी लॉंडरिंग सुरू होते का याची चौकशीदेखील सुरू आहे.
राज्यभरात क्यूआर कोडचा फंडा
दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात काही तत्त्वांकडून धार्मिक स्थळांवरील क्यूआर कोडच्या नावाखाली असे प्रकार सुरू आहेत. अशा क्यूआर कोडची तपासणी करण्याचे निर्देश मुंबईहून देण्यात आले आहेत.