डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 2, 2023 14:24 IST2023-03-02T14:23:32+5:302023-03-02T14:24:25+5:30
Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर
- राकेश घानोडे
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेमुळे गवळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गवळीच्या याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट मिळविण्यासाठी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांना अर्ज सादर केला होता. गवळीला या शासन निर्णयाचा लाभ दिला जाऊ शकत नाही, असे कारण नमूद करून तो अर्ज १२ जानेवारी २०२३ रोजी फेटाळण्यात आला. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कारागृह अधीक्षकांनी वादग्रस्त निर्णय देताना योग्य बाबी विचारात घेतल्या नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून कारागृहातून सोडण्यात यावे, असे गवळीचे म्हणणे आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.