मेडिकलमध्ये कुत्र्यांची ‘नाइट ड्युटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:21+5:302021-02-05T04:57:21+5:30
नागपूर : मेडिकलमध्ये रात्री सुरक्षारक्षक झोपा काढतात तर मोकाट कुत्रे ‘नाइट ड्युटी’ बजावत असल्याचा काहीसा प्रकार समोर आला आहे. ...

मेडिकलमध्ये कुत्र्यांची ‘नाइट ड्युटी’
नागपूर : मेडिकलमध्ये रात्री सुरक्षारक्षक झोपा काढतात तर मोकाट कुत्रे ‘नाइट ड्युटी’ बजावत असल्याचा काहीसा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, अपघाताच्या रुग्णांसाठी असलेल्या वॉर्ड क्र. २८च्या आत येऊन कुत्रे खाण्याचा शोध घेताना व्हिडीओेमधून समोर आले. या प्रकरणाची प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंह यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपघातातील जखमी रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर सेंटर स्थापन केले. या केंद्रामुळे अनेकांना जीवनदान मिळाले, परंतु कोरोनाचे रुग्ण वाढताच या केंद्राला डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये रूपांतरित केले. यामुळे अपघातातील जखमी रुग्णांसाठी मेडिकलच्या पहिल्या मजल्यावर वॉर्ड क्र. २८ तयार करण्यात आला. सध्या या वॉर्डात २५ रुग्ण भरती आहेत. भरती असलेल्या रुग्णाच्या एका नातेवाइकाला रात्री वॉर्डात मोकाट कुत्रे फिरत असल्याचे व सुरक्षारक्षक खुर्चीवरच झोपून असल्याचे दिसून आले. त्याने मोबाइलमधून याचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. यामुळे मेडिकल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या प्रकरणाला गंभीरतेने घेत डॉ. सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले.
-दोषींवर कारवाई होईल
‘लोकमत’शी बोलताना डॉ. सिंह म्हणाले, वॉर्डात कुत्रे फिरणे हा गंभीर प्रकार आहे. हा व्हिडीओ खरा आहे का, याची चौकशी केली जाणार आहे. यात जर कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. शिवाय, महानगरपालिकेला मेडिकलच्या परिसरात असलेले कुत्रे पकडून घेऊन जाण्याचे पत्र दिले आहे.