Coronavirus in Nagpur; खरंच कोरोना हवेतून पसरतो का? डॉक्टरांची संमिश्र मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 06:30 IST2021-04-27T06:30:00+5:302021-04-27T06:30:02+5:30
Coronavirus in Nagpur तज्ज्ञांच्या एका पथकाने उपलब्ध विविध संशोधनांच्या आधारावर कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा केला आहे. परंतु, शहरातील डॉक्टरांनी या संदर्भात संमिश्र मते व्यक्त केली आहेत.

Coronavirus in Nagpur; खरंच कोरोना हवेतून पसरतो का? डॉक्टरांची संमिश्र मते
मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तज्ज्ञांच्या एका पथकाने उपलब्ध विविध संशोधनांच्या आधारावर कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा केला आहे. परंतु, शहरातील डॉक्टरांनी या संदर्भात संमिश्र मते व्यक्त केली आहेत.
‘आयएमए’चे माजी अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला म्हणाले, काही अभ्यासात कोरोना विषाणू हवेमधून पसरत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, असा प्रसार केवळ बंदिस्त वातावरणात होतो. मोकळ्या वातावरणात हवेतून कोरोना पसरत असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. सहा फूट दूर राहिल्यास एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत नाही. याशिवाय कोरोनाची तीव्रता विविध घटकांवर अवलंबून आहे. त्यातील एक घटक आहे रोगप्रतिकारशक्ती. आयसीएमआर यांनी कोरोना प्रसाराचा मार्ग अद्याप निश्चितपणे सांगितलेला नाही. ते पुढील आठवड्यापर्यंत यासंदर्भात माहिती जारी करू शकतात.
डॉ. महेश दोशी यांनी संशोधनाचे समर्थन करून कोरोना हवेतून पसरत असल्याचे सांगितले. ९० टक्के विषाणूजन्य आजार हे हवेतून पसरतात. कोरोना एका ठिकाणी १२ ते १४ तास कृतीशील राहतो. त्यामुळे नागरिक गर्दी करतात तेव्हा कोरोना झपाट्याने पसरतो, अशी माहिती दिली.
कोरोना हवेतून पसरत असल्याचे सहा शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे तर हा आजार हवेतून पसरत नसल्याचे १०० शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, याकडे डॉ. अशोक अरबट यांनी लक्ष वेधले. कोरोना हवेतून पसरत असल्यास प्रतिबंधात्मक नियमांमध्ये बदल करावे लागतील. आपल्याला चांगल्या मास्कची गरज भासेल. शारीरिक अंतर वाढवावे लागेल. निर्जंतुकीकरण योग्य पद्धतीने करावे लागेल. कोरोना हवेतून पसरत नसल्याचा ठोस पुरावा नाही. हा आजार सध्या वेगात पसरत आहे. वैज्ञानिकांनी मानव व जनावरांवर विविध प्रयोग केले आहेत. हा विषाणू हवेत तीन तास थांबतो. त्यामुळे हवेतून कोरोना संक्रमण होऊ शकते. परंतु, हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगितले.