पदवीधरमध्ये आज मतसंग्राम
By Admin | Updated: June 20, 2014 01:08 IST2014-06-20T01:08:13+5:302014-06-20T01:08:13+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी मतदान होत आहे. सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजारावर पदवीधर

पदवीधरमध्ये आज मतसंग्राम
१४ उमेदवार - ३१७ मतदान केंद्रे
नागपूर: लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी मतदान होत आहे. सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजारावर पदवीधर मतदार त्यांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी ३१७ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदान करतील.
मतदानासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि कामगार यांना मतदान करता यावे म्हणून चार तासाची सुटी देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर व्हीडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहे. २४ तारखेला नागपूर येथे प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.
नागपूर विभागातील नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमिळून पदवीधर मतदारसंघ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे बबन तायवाडे, भाजप-सेना युतीचे प्रा. अनिल सोले, अपक्ष किशोर गजभिये आणि महेंद्र निंबार्ते या चार प्रमुख उमेदवारांसह एकूण १४ जण रिंगणात आहेत. एकूण २ लाख ८७ हजार ६२२ मतदार असून त्यांच्यासाठी विभागात ३१७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार ते पाच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १५०० कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होणार असून मतदारांना नकारात्मक मतदानाचा(नोटा) पर्यायही देण्यात आला आहे. एकूण ३ लाख ५० हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. त्याचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यासाठी २७०००, गोदिंया जिल्ह्यासाठी २२०००, वर्धा ३४०००, चंद्रपूर ४५०००, गडचिरोली १६००० आणि नागपूर जिल्ह्यासाठी २ लाख ४ हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २ हजार मतपत्रिका राखीव ठेवण्यात येणार आहे.
सोले यांच्यासाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर तायवाडे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतल्या. अपक्ष किशोर गजभिये यांना बसपाने पाठिंबा जाहीर केला. प्रचार करताना उमेदवारांनी स्थानिक नेटवर्कवर भर दिला. हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात आला.
मतदार यादी संकेतस्थळावर
लोकसभा आणि विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच प्रथमच पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदारांची यादी व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध आहे.