खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले
By Admin | Updated: July 15, 2014 01:11 IST2014-07-15T01:11:23+5:302014-07-15T01:11:23+5:30
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. प्रशासनाने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले
जिल्हा परिषद : दोन डॉक्टरांवर कारवाई
नागपूर : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. प्रशासनाने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांवर उपचार व्हावेत, अशी अपेक्षा असते. यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयी वास्तव्यास असणे गरजेचे आहे. परंतु काही डॉक्टर मुख्यालयी वास्तव्य न करता खासगी व्यवसाय करतात. जि.प.सभेत सदस्यांनी अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती.
याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्थायी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांना सेवेतून कमी केले, तर डॉ. गुणवंत पिसे यांची हिवराबाजार येथे बदली करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्रात नियुक्ती असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाही. या संदर्भातील तक्र ारींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)
सेवा समाप्तीचा
आदेश मागे
मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील ४५ कंत्राटी डॉक्टर सहभागी झाले होते. संपात सहभागी डॉक्टरांच्या सेवा समाप्तीचे आदेश शासनाने दिले होते. परंतु कारवाई टाळण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांनी सोमवारी जोंधळे यांची भेट घेतली. भविष्यात कोणत्याही संपात वा आंदोलनात सहभागी होणार नाही, असे लेखी हमीपत्र त्यांनी लिहून दिल्याने जोंधळे यांनी सेवा समाप्तीचे आदेश मागे घेतले.