झुडपी जंगल म्हणायचे का?
By Admin | Updated: December 2, 2014 00:37 IST2014-12-02T00:37:05+5:302014-12-02T00:37:05+5:30
एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ

झुडपी जंगल म्हणायचे का?
भाऊसाहेबांच्या स्मारकांचे काय होणार ? : महापालिकेने लक्ष घालावे
नागपूर : एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ उभारण्यात आला आहे. ‘हिंदुस्थानची आजची खरी गरज नि:स्वार्थी व स्वतंत्र बाण्याच्या माणसाची आहे व ही गरज मी काही अंशी जर भरून न काढली तर मी व्यर्थ जन्माला आलो, असे समजेन’ हा विचार कोरण्यात आलेला आहे. परंतु हा स्तंभही झाडाझुडपांमध्ये लपला असल्याने त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही.
असामाजिक तत्त्वाचा वावर
पुतळा परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी सायंकाळनंतर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. दारू पिणे, जुगार खेळणे आदींसारखी अनेक गैरकृत्ये येथे सर्रास सुरू असतात. याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही.
अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजि. मित्र परिवार राबवणार स्वच्छता मोहीम
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याची ही दुरवस्था पाहून परिसर स्वच्छ करण्यासाठी अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. उद्या २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणार आहेत.
आंदोलनाचा इशारा
२७ डिसेंबर रोजी भाऊसाहेबांची जयंती आहे. दरवर्षी जयंतीच्या दोन दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे पुतळ्याच्या परिसराची थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. परंतु आता असे चालणार नाही. पुतळ्याची देखभाल करण्याकरिता कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने केली आहे. यासाठी प्रशासनाला २६ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास साखळी व आमरण उपोषण आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मोहीतकर व सचिव प्रणय पराते यांच्यासह भूषण खडसे, अजय तायवाडे, लक्ष्मीकांत पडोळे, डॉ. सहानपुरे, देवेंद्र मते आदींनी दिला आहे.