मृत पक्षांना स्पर्श करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:17+5:302021-01-13T04:21:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या काही भागात बर्ड फ्लू फैलण्याची शक्यता वर्तवली जात असताना पुण्याच्या आरोग्य सेवा ...

मृत पक्षांना स्पर्श करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या काही भागात बर्ड फ्लू फैलण्याची शक्यता वर्तवली जात असताना पुण्याच्या आरोग्य सेवा निदेशालयाने मनपा सोबतच जिल्हा परिषदेला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा व इन्फ्लूएन्जा ग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा अलर्ट मोडवर आली आहे.
पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे आढळून आल्यास या संदर्भात मनपा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मृत पक्ष्यांना हाताने स्पर्श करू नका, पशु संवर्धन विभागाशी संमन्वय साधण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा बदक, कोंबड्या व अन्य पक्षी मोठ्या प्रमाणात मृत आढळत आहेत.
केरळमध्ये बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर आपत्ती घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर तालुक्यातील काही भागात पक्षी मृत आढळून आले आहेत. याचा विचार करता मनपा प्रशासनासोबतच जिल्हा परिषदेला अलर्ट करण्यात आले आहे.
...
घाबरू नका, सतर्क राहा
बर्ड फ्लूला घाबरण्याचे कारण नाही. पक्षाच्या संपर्कात येऊ नका, ज्या भांड्यात पक्ष्यांना अन्न दिले जाते. ते भांडे दररोज स्वच्छ करा, पक्षी मृत आढळून आल्यास त्याला स्पर्श करू नका, जिल्हा आरोग्य नियंत्रण कक्षाला याची माहिती द्या, मनपा क्षेत्रात झोनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्या, कच्चे चिकन व चिकनपासून पदार्थ तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा.
अर्धवट शिजलेले मांस खाऊ नये, प्रवासी पक्षी आढळून आल्यास त्याची माहिती वन विभाग व पशु संवर्धन विभागाला द्यावी.
...
कच्चे मांस खाऊ नका
अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका असे आवाहन मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे. बर्ड फ्लूला घाबरण्याचे कारण नाही. मात्र सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. मृत कोंबड्या व पक्ष्यांची माहिती तातडीने मनपाला द्यावी, असे आवाहन महल्ले यांनी केले आहे.
...
असे आहेत दिशा निर्देश
- इन्फ्लूएन्जासदृश रुग्णांचे प्रभावीपणे सर्वेक्षण करा, पोल्ट्री फार्म, कत्तलखाने येथे काम करणाऱ्यांचा सर्वे करावा, संशयित आढळल्यास राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांच्याकडे नमुने पाठवा.
-पशुसंवर्धन विभागाला बर्ड फ्लू बाबतच्या दैनंदिन अहवालाची माहिती द्यावी लागेल. बर्ड फ्लू विचारात घेता वन विभाग,सार्वजनिक आरोग्य, कृषी विभाग यांनी आपसात समन्वय ठेवावा.