गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळू नका

By Admin | Updated: July 5, 2015 02:42 IST2015-07-05T02:42:25+5:302015-07-05T02:42:25+5:30

मेयो, मेडिकल व डागा या रुग्णालयात येणारे रुग्ण गरीब असतात. यामुळे येथे सर्व वैद्यकीय उपचार वेळेत उपलब्ध झाले पाहिजेत.

Do not play with the lives of poor patients | गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळू नका

गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळू नका

मेडिकल, मेयो, डागाच्या डॉक्टरांना तंबी : गडकरी, तावडेंनी घेतला शासकीय रुग्णालयांचा आढावा
नागपूर : मेयो, मेडिकल व डागा या रुग्णालयात येणारे रुग्ण गरीब असतात. यामुळे येथे सर्व वैद्यकीय उपचार वेळेत उपलब्ध झाले पाहिजेत. कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, शोषण होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशा कडक शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी तंबी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक शनिवारी मेडिकलमध्ये पार पडली. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वच आमदारांनी रुग्णालयाच्या समस्यांना घेऊन तडाखेबंद बॅटिंग केली.
गडकरी म्हणाले, या तिन्ही रुग्णालयाच्या समस्या सोडविणे व त्याच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्वाेतोपरी मदत केली जाईल. चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहू, पण गरिबांच्या उपचारात हयगय झाल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गर्भजल परीक्षण मेडिकलमध्ये सुरू करा
थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांना शासकीय रुग्णालयात आवश्यक औषधोपचार व सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची समस्या थॅलेसिमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी बैठकीत मांडली. यावर गडकरी यांनी रुग्णांना तत्काळ औषधे उपलब्ध करून देण्याचे व गर्भजल परीक्षण सुरू करण्याचेही निर्देश दिले.
रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध करून द्या
नागपूर : गडकरी म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत. रुग्णालयाच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या साठी चांगल्या संस्थांना सहभागी करून घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा विकास करा
आ. डॉ. मिलिंद माने यांनी आपल्या क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा प्रश्न लावून धरला. ते म्हणाले, या रुग्णालयात पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. हे रुग्णालय ५६८ खाटांचे होणार होते. परंतु नंतर निधीची तरतूदच झाली नाही. भविष्यात ती होईल का, या विषयी दाट शंका आहे. या ऐवजी जिल्हा रुग्णालय सुरू करण्याचे किंवा सिकलसेल रिसर्च युनिट सुरू करावे, अशी मागणी केली.
मेडिकलमध्ये येणार ‘नॅट’ तंत्रज्ञान
‘सुरक्षित रक्त व रक्तघटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्तघटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञानाची मागणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी केली. यावर गडकरी यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
औषधांची बिले आता प्रलंबित राहणार नाही
पश्चिम महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमधील औषधांचे बिले मंत्रालयात पाठविली जात नाही, अधिष्ठात्यांच्या स्तरावरच त्यांना मंजुरी मिळते. मात्र विदर्भातील कॉलेजची बिले मंत्रालयात पडून राहतात. बिल थकल्याने पुरवठादार औषधे देत नाही, या समस्येवर गडकरी यांनी तोडगा काढत, आता मंत्रालयात औषधांची बिले पाठवायची नाही, असे निर्देश दिले. अधिष्ठात्यांचे मंजूर अनुदान ९.६ कोटी वरून ३० कोटी करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ यांना दिल्या.
यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी मिळणार दोन कोटी
मेडिकलमध्ये अनेक अद्ययावत यंत्रसामग्री आहे. परंतु त्याच्या देखभालीसाठी केवळ ३१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळतो. निधी अपुरा पडत असल्याने संबंधित कंपन्या यंत्राची दुरुस्ती वेळेत करीत नाही. अनेक यंत्र बंद असतात. यंत्रसामग्रीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ३० लाख रुपयांची गरज असल्याचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी अभ्यागत मंडळाच्या लक्षात आणून दिले. यावर गडकरी यांनी सचिव मेघा गाडगीळ यांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
‘ट्रामा’वरून बांधकाम विभागाची कानउघाडणी
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत ‘ट्रामा केअर सेंटर’चे ११.६० कोटी रुपये खर्चून बांधकाम झाले.परंतु बांधकामात काही त्रुटी आढळून आल्याने मेडिकल प्रशासनाला आणखी १८ कोटी ४० लाख रुपयांची गरज असल्याचे डॉ. निसवाडे यांनी लक्षात आणून दिले. यावर गडकरी यांनी बांधकाम विभागाची कानउघाडणी केली. ‘ट्रामा’साठी पदभरती कंत्राटी पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी मेयो, डागा, शासकीय आयुर्वेद रुग्णालय व दंत रुग्णालयाच्या समस्येवरही चर्चा झाली. मंचावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, शासकीय आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार उपस्थित होते. संचालन डॉ. निसवाडे यांनी केले तर आभार डॉ. अपूर्व पावडे यांनी मानले. बैठकीला आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ठेंग व कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे उपस्थित होते.

Web Title: Do not play with the lives of poor patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.