दोन महिने होऊनही हृदय शस्त्रक्रिया नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:04 IST2017-08-22T00:03:21+5:302017-08-22T00:04:42+5:30

अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु चाचणीच झाली नाही, पैसे परत मिळण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहे...

Do not have heart surgery for two months ... | दोन महिने होऊनही हृदय शस्त्रक्रिया नाही...

दोन महिने होऊनही हृदय शस्त्रक्रिया नाही...

ठळक मुद्देरुग्णांनी वाचला समस्यांचा पाढा : गिरीश व्यास यांची ‘सुपर’ला आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु चाचणीच झाली नाही, पैसे परत मिळण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहे... दारिद्र्यरेषेखालील रुग्ण आहे. परंतु अ‍ॅन्जिओग्राफी करण्यासाठी पाच हजार रुपये मागत आहे. एवढे पैसे नसल्याने उपचार थांबवून ठेवण्यात आले आहे... हृदयशस्त्रक्रियेसाठी दोन महिने होऊनही प्रतीक्षा संपली नाही... हृदयशस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात पाठविले जाते... सहामधून दोन-तीन औषधे मिळतात इतर औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात... प्रतीक्षालय नसल्याने व्हरांड्यात बसावे लागते... यासारख्या अनेक समस्यांचा पाढाच रुग्णांनी आमदार गिरीश व्यास यांच्यासमोर वाचल्याने येथे व्यवस्थापन आहे की नाही, हा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी १२.१५ वाजता आ. गिरीश व्यास यांनी अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक रुग्णाने आपली समस्या मांडण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयातील समस्या पाहून त्यांनी सफाई कर्मचाºयांपासून ते अधिकाºयापर्यंत अनेकांना फटकारले.
सीसीटीव्ही बंद
आ. व्यास यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेट दिली असता सीसीटीव्ही बंद असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याविषयी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे विचारणा केली असता केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बायोमेट्रिक सुरू आहे की नाही याचीही तपासणी केली.
हृदय शल्यक्रियेच्या रुग्णाची पळवापळवी
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाºया गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे. परंतु ‘सुपर’मध्ये हृदयशल्यक्रियेनंतर देखभाल करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे कारण खुद्द विभागप्रमुखच सांगतात व जिथे ही योजना कार्यान्वित आहे त्यातील विशिष्ट खासगी रुग्णालयात जाण्यास सांगतात, अशी तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली.
मरावे की जगावे...
दोन महिने झाले, परंतु हृदय शस्त्रक्रियेची प्रतीक्षा संपली नाही. आवश्यक औषधेही मिळत नाही. यामुळे मरावे की जगावे, हा प्रश्न लक्ष्मीबाई भगत या ८० वर्षीय वृद्ध महिलेने उपस्थित केला.
औषध असूनही रुग्ण वंचित
एका महिला रुग्णाने रुग्णालयात औषध असूनही औषधवितरक औषध देत नसल्याची तक्रार आ. व्यास यांच्याकडे केली. आ. व्यास यांनी औषधवितरकाकडे याविषयी विचारणा केली. त्याने नवीन असल्याचे सांगत, नाकारलेले औषध डब्यातून काढून रुग्णाला दिले.
शुल्क भरले, पण चाचणीच झाली नाही
राजमल पांडे म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु ही चाचणीच झाली नाही. आता हे पैसे परत करण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा मारत आहे. आज पुन्हा २० दिवसानंतर येण्यास सांगितल्याची तक्रार मांडली.
‘सुपर’चे रुग्ण अडचणीत : आ. व्यास
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या समस्या ऐकून घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना आ. व्यास म्हणाले, रुग्णालयात व्यवस्थापनच नाही. यामुळे येथील रुग्ण अडचणीत आले आहेत. रुग्णालयात सफाई कर्मचाºयांपासून ते डॉक्टर वेळेवर येत नसल्याचे, परवानगी न घेता अनुपस्थित राहत असल्याच्या अनेक समस्या आहेत. आवश्यक औषधे नाहीत, शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे, साध्या स्टेशनरीसाठी रुग्णांना वेठीस धरले जात आहे, येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जात आहे, अशा अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांची वैद्यकीय शिक्षण संचालकस्तरावरून चौकशी करण्यात येईल.
कुठून आणू पाच हजार रुपये
बुद्धनगर येथून आलेले विनोद उके म्हणाले, दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. दारिद्र्य रेषेखालील गटात मोडतो. तसे रेशनकार्ड आहे. डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओग्राफी करण्यास सांगितले. परंतु यासाठी पाच हजार रुपये शुल्क द्यावे लागते. एवढे पैसे नाहीत. नि:शुल्क उपचारासाठी मदत मागतोय पण कोणीच मदत करीत नसल्याची व्यथा मांडली.
हजेरी लावून पळून जातात कर्मचारी
रुग्णालयात ३६ सफाई कर्मचारी आहेत. त्यातील चारच कर्मचारी उपस्थित असल्याचे लक्षात आले. आ. व्यास यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
आ. व्यास यांनी नियमांना फासला हरताळ
हृदयशल्यक्रियेच्या वॉर्डात गंभीर रुग्ण असतात. त्यांना बाहेरच्या व्यक्तींचा संसर्ग होऊ नये म्हणून वॉर्डात जाण्यापूर्वी जोडे-चपला बाहेर काढावे लागतात. तसेच तोंडाला मास्क बांधून जाण्याचा नियम आहे. परंतु आ. व्यास हे आपल्या लवाजम्यासह नियमांना हरताळ फासत वॉर्डात पोहचले. त्यांच्यासोबत १५-२० जण होते. रुग्णांच्या जिविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.
तीन महिन्यानंतर उघडले स्वच्छतागृह
आ. व्यास यांनी हृदयशल्यचित्सकाच्या वॉर्डाला भेट दिली असता स्वच्छता गृहाची दुर्गंधी संपूर्ण वॉर्डात पसरली होती. याविषयी अधिकाºयांना विचारले असता, तब्बल तीन महिन्यापासून बंद पडलेले स्वच्छतागृहाची सफाई होत असल्याची माहिती मिळताच आ. व्यास यांनी डोक्यावर हात मारून घेतला.

Web Title: Do not have heart surgery for two months ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.