सॅनिटरी पॅड इतर कचऱ्यात टाकू नका, कागदात गुंडाळून द्या
By सुमेध वाघमार | Updated: March 31, 2024 18:37 IST2024-03-31T18:37:33+5:302024-03-31T18:37:45+5:30
-सॅनिटरी वेस्टच्या जनजागृतीसाठी महिलांची लाल रंगाच्या पोशाखात रॅली

सॅनिटरी पॅड इतर कचऱ्यात टाकू नका, कागदात गुंडाळून द्या
नागपूर: सॅनिटरी पॅडचा कचरा आरोग्यासह पर्यावरणासाठी देखील घातक आहे, सॅनिटरी कचरा वर्षानुवर्षे तशाच स्थितीत राहतो, पर्यावरण संवर्धनासाठी ‘सॅनिटरी वेस्ट’चे योग्य विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी तो इतर कचºयात टाकू नका. सॅनिटरी पॅड कागदात गुंडाळा, लाल बिंदूने चिन्हांकित करा, विल्हेवाट लावण्यासाठी लाल कचºयाचा डबा वापरा, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.
मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात रविवारी मनपा मुख्यालय ते झीरो माईल फ्रीडम पार्क दरम्यान ‘सॅनिटरी वेस्ट’ संदर्भात लाल रंगाचे पोषाख परिधान करून जनजागृती रॅली काढण्यात आली. झीरो माईल फ्रीडम पार्क येथे आयोजित कार्यक्रमात गोयल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, समाज कल्याण अधिकारी तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार डॉ. विजय जोशी, समाजसेविका आंचल वर्मा, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे संस्थापक व स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर कस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, संगीता रामटेके, यांच्यासह महिला सफाई कर्मचारी, विविध संस्थाचे प्रतिनिधी, स्वयंसहायता महिला गटांचे प्रतिनिधी, आशा-अंगणवाडी सेविका, मनपाच्या एमएके आझाद कनिष्ठ महाविद्यालय आणि ताजबाग कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. यावेळी स्वीप अंतर्गत महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली. ‘सॅनिटरी वेस्ट’ संदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले.