पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:04 IST2017-11-29T00:03:12+5:302017-11-29T00:04:07+5:30

आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली.

Do not defame the police department; Nagpur Police Commissioner warned | पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी

पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी

ठळक मुद्देबैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली कानउघाडणी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत गिट्टीखदान ठाण्यातील संदल प्रकरणावर चर्चा करताना उपस्थित ठाणेदारांची कानउघाडणी केली. २१ नोव्हेंबरला रात्री युवराज नावाच्या कर्मचाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त गिट्टीखदान ठाण्यात संदल वाजविण्यात आला होता. ठाण्याच्या आत झालेल्या डान्स पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. २१ नोव्हेंबरला सकाळी लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकरचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. यावेळी गिट्टीखदान ठाण्यात उत्सव सुरू होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी सावनेर, मध्य प्रदेशाच्या सीमेवर राहुल आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. हे प्रकरण प्रसार माध्यमात आल्यामुळे अधिकाऱ्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना सांगितले की, गिट्टीखदानसारख्या घटनांमुळे पोलीस विभागाचे नाव खराब होते. या प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. वाढदिवस साजरा करायचा असेल तर सुटी घेऊन साजरा करा. ठाण्यात उत्सव साजरा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात संदल वाजविण्याची माहिती गिट्टीखदानच्या ठाणेदारालाही नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो दुसरीकडचा असल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पोलीस आयुक्त नाराज होते. या प्रकाराची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी ठाणेदारांना दिल्या. मागील काही दिवसातील खून आणि घटना तसेच हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताबाबत त्यांनी ठाणेदारांशी चर्चा केली.

ठाणेदारांना मनुष्यबळाची चिंता
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी बाहेरून कमी संख्येने अधिकारी, कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश पोलिसांचा बंदोबस्तात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे ठाणेदार चिंतेत आहेत. त्यांच्या मते अधिवेशनादरम्यान अचानक एखादी समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या नाकीनऊ येणार आहेत.

 

Web Title: Do not defame the police department; Nagpur Police Commissioner warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस