पाश्चिमात्य अन् भारतीय अन्नाची तुलना करू नका : बी. दिनेश कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:16 IST2018-12-09T01:14:48+5:302018-12-09T01:16:18+5:30
पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.

पाश्चिमात्य अन् भारतीय अन्नाची तुलना करू नका : बी. दिनेश कुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.
न्युट्रिशन सोसायटी आॅफ इंडिया नागपूर चॅप्टर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘न्युट्रिकॉन २०१८’ या परिषदेचे आयोजन वनामतीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभाग वर्धाचे सहायक आयुक्त डॉ. पुष्पहास बल्लाळ होते. सहअध्यक्ष म्हणून गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अभय इत्तडवार उपस्थित होते. डॉ. बी. दिनेशकुमार म्हणाले, अन्नच आपले औषध आहे. परंतु आपण अनेक वर्षांपासून पाश्चिमात्य पद्धतींचा आंधळेपणाने स्वीकार करीत आहोत. तेथील अन्न त्या नागरिकांच्या गरजेनुसार बनविण्यात येते. दोन वेगवेगळ्या अन्नामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊन आजार जडतात. युरोपीय देशात भारतीय अन्नपदार्थांना बंदी आहे. परंतु भारतात युरोपीयन अन्नपदार्थांसाठी खुला बाजार आहे. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून लवकरच सकारात्मक बदल होणार आहे. न्युट्रासुटिकल्स आणि पारंपरिक अन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत डॉ. बी. दिनेश कुमार यांनी व्यक्त केले. डॉ. पुष्पहास बल्लाळ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्युट्रासुटिकल्सच्या यादीतील अन्नपदार्थांबाबतच्या नियमात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्युट्रिशन (एनआयएन) हैदराबादचे वैज्ञानिक डॉ. एन. हरी शंकर यांनी ‘एनआयएन’मध्ये अन्नाच्या दुष्परिणामांचे परीक्षण कसे करण्यात येते, याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. सी.डी. मायी यांनी जैविक तंत्रज्ञानातून अन्नाला सशक्त करण्याच्या प्रयोगाबद्दल उदाहरणासह माहिती दिली. डॉ. राजीव मोहता यांनी भुकेची मानसिकता या विषयावर बोलताना वयोमानानुसार खाण्याच्या आवडीनिवडीत बदल होत असून मुले, आईवडिलांचे उद्बोधन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश इटनकर यांनी मानले. यावेळी फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जास्मीन गेव्ह आवारी, समन्वयक डॉ. रेखा शर्मा, डॉ. सबिहा वली, मार्गदर्शक डॉ. ए. एन. राधा, परिषदेच्या आयोजक डॉ. कविता गुप्ता, डॉ. रेणुका माईंदे उपस्थित होत्या.