‘डी.लिट’चा सोपा मार्ग होणार ‘डीलिट’
By Admin | Updated: July 15, 2016 03:02 IST2016-07-15T03:02:13+5:302016-07-15T03:02:13+5:30
एक काळ होता जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठातून ‘डी.लिट.’ही मानद पदवी मिळविणे फार मानाचे समजले जायचे.

‘डी.लिट’चा सोपा मार्ग होणार ‘डीलिट’
नागपूर विद्यापीठ : नियमांत बदल, गुणवत्तेवर भर
नागपूर : एक काळ होता जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठातून ‘डी.लिट.’ही मानद पदवी मिळविणे फार मानाचे समजले जायचे. संशोधनातील मौलिक कार्यासाठी देण्यात येणारी ही पदवी मिळविण्यासाठी नियम मात्र गुणवत्तेला साजेसे नाही. अगदी पंचविशीतील उमेदवारदेखील ‘डी.लिट.’साठी प्रबंध पाठवायला लागले आहे. त्यामुळे ही पदवी मिळविण्याचा सोपा मार्ग बंद करण्याचा नागपूर विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला असून नियमांत बदल करण्याची युद्धस्तरावर तयारी सुरू आहे.
नागपूर विद्यापीठात ‘डी.लिट.’ पदवी मिळविण्यासाठी गेल्या काही काळापासून अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विद्यापीठातर्फे ही पदवी देण्यात येत असली तरी याचे नियम फारसे कडक नाहीत. अगदी ‘पीएचडी’साठी नोंदणी केलेला किंवा साधी पदव्युत्तर पदवी मिळविलेला उमेदवार ‘डी.लिट.’साठी प्रबंध सादर करु शकतो. त्यामुळे या पदवीला आवश्यक असलेली गुणवत्ता समोर येत नाही व तिचे महत्त्व कमी होत आहे.
हीच बाब लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठाने ‘डी.लिट.’च्या नियमांत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. या पदवीसाठी गुणवत्तापूर्ण व अथक संशोधनानंतर तयार झालेले समाजोपयोगी प्रबंध येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नियम तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)
‘पीएचडी’च्या ५ वर्षानंतरच ‘डी.लिट.’चा पर्याय
नव्या प्रस्तावित नियमांनुसार ‘डी.लिट.’साठी प्रबंध सादर करणारे उमेदवार ‘पीएचडी’ असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संंबंधित उमेदवाराने ‘पीएचडी’करुन पाच वर्षे झाली असली पाहिजेत. जर उमेदवार पदव्युत्तर पदवी घेतलेला असेल तर त्याच्या पदवीला १५ वर्षे झाले असले पाहिजेत व त्यानंतरच्या कालावधीत त्याने गुणवत्तापूर्ण संशोधन केले असले पाहिजे. संबंधित उमेदवाराची नोंदणी करायची की नाही, त्याचा प्रबंध ‘आरआरसी’समोर (रिसर्च अॅन्ड रिकग्नेशन कमिटी) येऊ द्यावा की नाही याचा निर्णय सहा सदस्यांची समिती करेल.