डीजेच्या आवाजाला घाबरून चेंगरीने झाला कोंबड्यांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:42+5:302021-01-13T04:20:42+5:30
कळमेश्वर : राज्यात बर्ड फ्लूच्या शिरकावानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मात्र, कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील ...

डीजेच्या आवाजाला घाबरून चेंगरीने झाला कोंबड्यांचा मृत्यू!
कळमेश्वर : राज्यात बर्ड फ्लूच्या शिरकावानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मात्र, कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० कोंबड्यांच्या मृत्यूला डीजेचा गोंगाट कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने लावला आहे. या कोंबड्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे डीजेच्या आवाजामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा तर्क मांडताना पशुसंवर्धन विभागाने घाई केल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. इकडे तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोल्ट्री फार्म संचालकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कळमेश्वर तालुक्यात जवळपास ८० ते ९० पोल्ट्री फार्म आहेत. येथे १२ लाखांवर कोंबड्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री फार्म परिसरात सुरक्षात्मक उपायोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत. यासोबतच तालुक्यातील जंगल परिसरात पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास याबाबत वनविभागाला पशुसंवर्धन विभागाशी समन्वय करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
असा आहे प्राथमिक अंदाज
- उबगीच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये जवळपास १२ हजारांवर कोंबड्या आहेत. फॉर्मजवळ रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डीजे वाजविण्यात आला होता. त्या डीजेच्या आवाजाने कोंबड्यांमध्ये गोंधळ उडाला. एकाच बाजूने सर्व कोंबड्या गोळा झाल्या. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीने कोंबड्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
- राज्यात बर्ड फ्लूचा अलर्ट असताना एकाच वेळी २५० कोंबड्या मृत्यू झाल्याने मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहेत. मंगळवारी अधिकाऱ्यांनी या फार्मला भेट दिली असता एकाही कोंबडीचा मृत्यू झाला नव्हता अथवा बर्ड फ्लूसदृश आजाराची लक्षणे येथील पक्ष्यांत दिसून आली नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज केने यांनी सांगितले.
-
उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या मृत्यूला डीजेचा आवाज कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे; पण याचे वैद्यकीय कारण समजून घेण्यासाठी दोन पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नमके कारण समजू शकेल.
डॉ. जयश्री भोगावकर
-सहायक आयुक्त, लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, कळमेश्वर
---
उबगी येथे कोंबड्यांचा मूत्यूचे कारण वैद्यकीय अहवालानंतरच कळेल. सध्या तालुक्यातील पोल्टी फार्म व तेथील पक्ष्यांची माहिती घेणे सुरू आहे. कळमेश्वर तालुक्यात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. तरी पोल्ट्री फार्म संचालकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.
डॉ. हेमंत माळोदे, पशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती कळमेश्वर