चक्कर येणे मोठ्या आजाराचे लक्षण
By Admin | Updated: February 8, 2015 01:15 IST2015-02-08T01:15:59+5:302015-02-08T01:15:59+5:30
हृदयासंबंधीचे आजार बळावले आहेत. साधारण ४० टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. यामुळे चक्कर येणे, क्षणमात्र बेशुद्ध होणे हा आजार नसला तरी, एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.

चक्कर येणे मोठ्या आजाराचे लक्षण
मार्टिन ग्रीन : ‘इसेकॉन-२०१५’ परिषदेला सुरुवात
नागपूर : हृदयासंबंधीचे आजार बळावले आहेत. साधारण ४० टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. यामुळे चक्कर येणे, क्षणमात्र बेशुद्ध होणे हा आजार नसला तरी, एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. म्हणून रुग्णाला चक्कर येण्यामागची कारणे डॉक्टरांनी शोधून काढली पाहिजेत, असा सल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त कॅनडा येथील ओरावा हार्ट इन्स्टिट्यूटचे मेडिसीन विषयाचे प्राध्यापक डॉ. मार्टिन ग्रीन यांनी येथे दिला.
इंडियन सोसायटी आॅफ इलेक्ट्रोकार्डिओलॉजी या संस्थेच्यावतीने ईसीजीवर राष्ट्रीय परिषद ‘इसेकॉन -२०१५’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आज शनिवारी उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आयोजित ‘सीनकोप : वेन टू वरी?’ या विषयावर ते बोलत होते.
चक्कर येणे हा हृदयासंबंधीचा आजार असू शकतो, असे म्हणत डॉ. ग्रीन यांनी चक्कर येण्यामागच्या कारणांचा शोध कसा घ्यावा, त्याची तपासणी कशी करावी व औषधोपचार कसा करावा, यासंबंधी विशेष मार्गदर्शन केले. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर काय करावे, या विषयावर डॉ. एच. राव यांनी मार्गदर्शन केले. बंद पडलेल्या हृदयावरील उपचार पद्धती, हृदयाला सुरळीत गती आणण्यासाठीच्या उपचारांची माहितीही त्यांनी दिली. दिवसभर चाललेल्या परिषदेत ईसीजीसारख्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करून हृदय रोगाचे निदान व त्यावरील उपचार पद्धती, हृदयाच्या स्पंदनाचे विविध आजार व हृदयक्रिया बंद पडणे यावरील नवनवीन अद्ययावत संशोधन यावर चर्चा घडून आणली.
वैद्यकीय अध्यापन क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर व मेडिसीन विषयावरील प्राध्यापक डॉ. गोपाल दुबे, डॉ. एस.एम. पाटील व डॉ. आर.जी. सालकर यांचा सत्कार करून परिषदेची सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. बी.जी. वाघमारे, डॉ. पुष्पा जगताप व डॉ. खलील उल्ला यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात ‘ईसीजी लर्निंग’ यावरील सीडीचे लोकार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. उदय माहोरकर यांनी केले. आभार परिषदेच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. प्रशांत जगताप यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजश्री खोत, डॉ. सुरेंद्र सूर्यवंशी, डॉ. अनिल मोडक, डॉ. कळमकर व डॉ. विनोद खंडाईत परिश्रम घेत आहेत.(प्रतिनिधी)