उपराजधानीत दिवाळीत कोट्यवधीची उलाढाल; दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 07:00 AM2020-11-16T07:00:00+5:302020-11-16T07:00:07+5:30

Nagpur News Diwali सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी इतवारी, महाल, लक्ष्मीनगर, धरमपेठ येथील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसात सुमारे ५०० कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

Diwali turnover in the Nagpur; Crowds for jewelry, electronics, two-wheelers and four-wheelers | उपराजधानीत दिवाळीत कोट्यवधीची उलाढाल; दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी खरेदीसाठी गर्दी

उपराजधानीत दिवाळीत कोट्यवधीची उलाढाल; दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी खरेदीसाठी गर्दी

Next
ठळक मुद्देकंपन्यांच्या विविध योजनांचा ग्राहकांना फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये दागिने, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप, तसेच रेडिमेड कपडे आणि दुचाकी व चारचाकी वाहनांचे शोरूम हाऊसफुल्ल होते. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी इतवारी, महाल, लक्ष्मीनगर, धरमपेठ येथील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसात सुमारे ५०० कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोरोना महामारीमुळे बाजारपेठेत आलेल्या आर्थिक मंदीवर दिवाळीच्या दिवसात मात केल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.

यंदा दिवाळीत बाजारपेठेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या सणांचे औचित्य साधत ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. त्यामुळे चांगला व्यवसाय झाल्याचा व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

दिवाळीत घरगुती वस्तूंसह इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची बाजारपेठ फुलून गेली होती. दुचाकी-चारचाकी वाहन खरेदीसाठी गर्दी झाली. सोने-चांदीसह फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मोबाईल, होम थिएटर खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. महाल, इतवारी, धंतोली, सीताबर्डी, लक्ष्मीनगर, खामला, कमाल चौक, सक्करदरा येथील शोरूममध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. दिवाळीच्या पाच दिवसामध्ये कोट्यवधीची उलाढाल झाली.

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विविध कंपन्यांनी उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी आकर्षक योजना आणल्या होत्या. या योजनांचा नागपूरकरांनी लाभ घेतला. शून्य टक्के योजना, स्क्रॅच कार्ड आणि ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

सराफा व्यापारी राजेश रोकडे म्हणाले, कोरोना महामारीमुळे दिवाळीत व्यवसाय होईल का, याबाबत संभ्रम होता. पण ग्राहकांनी धनत्रयोदशीपूर्वीच खरेदीला सुरुवात केली. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गर्दी कायम होती. या दिवाळीतील हंगाम अपेक्षेपेक्षा चांगला झाला. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर म्हणाले, दिवाळीत वॉशिंग मशीन, फ्रीज, एलईडी टीव्ही, मोबाईल, ओव्हन खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. दिवाळीच्या दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसाय झाला.

Web Title: Diwali turnover in the Nagpur; Crowds for jewelry, electronics, two-wheelers and four-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी