शनिवारपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 00:25 IST2020-11-06T21:30:58+5:302020-11-07T00:25:09+5:30
Diwali holidays to schools , Nagpur news जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शनिवार ७ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शनिवारपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शनिवार ७ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे गत सत्राच्या अंतिम टप्प्यापासून म्हणजेच १६ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद आहेत. आता नवीन सत्र सुरू होऊन ते मध्यावधीपर्यंत आल्यानंतरही अद्यापपर्यंत प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेही गिरविले, सोबतच ऑनलाईन पद्धतीनेच प्रथम सत्राची परीक्षाही पार पडली. त्यानंतरही अद्यापपर्यंत शाळा सुरू झालेल्या नाहीत. तशा शाळांना वर्षातून पन्नासहून अधिक सुट्या मिळतात. त्यामध्ये दिवाळीच्या १४ दिवसांच्या सुट्यांचा समावेश आहे. या सुट्या ७ ते २० नोव्हेंबर या काळात शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शाळांचे द्वितीय सत्र हे २१ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर लगेच २२ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शाळांना सुटी आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त सुटी दिल्यानंतर शाळांचे नियमित कामकाज तसे पाहता २३ नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते.