जिल्हा बँक घोटाळ्याचा खटला गायकवाड यांच्याकडून काढला
By Admin | Updated: June 21, 2014 02:36 IST2014-06-21T02:36:45+5:302014-06-21T02:36:45+5:30
बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधीच्या रोखे घोटाळ्याचा खटला ..

जिल्हा बँक घोटाळ्याचा खटला गायकवाड यांच्याकडून काढला
नागपूर : बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधीच्या रोखे घोटाळ्याचा खटला राज्य सरकारने अचानक एक अधिसूचना जारी करून अॅड. आर. बी. गायकवाड यांच्याकडून काढून घेतला. गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या घोटाळ्याचा खटला चालविण्यासाठी राज्याच्या न्याय व विधी विभागाने मार्चमध्ये प्रसिद्ध वकील अॅड. आर. बी. गायकवाड यांची एका अधिसूचनेद्वारे विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती. आता अचानक गायकवाड यांच्या नावाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. हा खटला चालविण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील दीपक कोल्हे यांना नेमले जाण्याची चर्चा आहे. गायकवाड यांच्या नावाची अधिसूचना रद्द करण्यामागे काही तरी गौडबंगाल असल्याचीही चर्चा आहे. १४९ कोटी ८२ लाखांच्या या रोखे घोटाळ्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बडतर्फ अध्यक्ष सुनील केदार, याच बँकेचे निलंबित सरव्यवस्थापक अशोक चौधरी, रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कु. कानन मेवावाला , नंदकिशोर त्रिवेदी सर्व रा. मुंबई, अमित वर्मा रा. अहमदाबाद, महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार सर्व रा. कोलकाता, बँकेतीलच कर्मचारी सुरेश पेशकर, असे ११ आरोपी आहेत. २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२० ब, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीने केला आहे. ^(प्रतिनिधी)