जिल्हा बँकेला मिळाले, आम्ही कोणते ‘पाप’ केले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:36+5:302021-05-23T04:08:36+5:30
शरद मिरे भिवापूर : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने भिवापूर तालुक्याला धुवून काढले. नुकसानीचे पंचनामे झाले. भरपाईपोटी लागणाऱ्या ...

जिल्हा बँकेला मिळाले, आम्ही कोणते ‘पाप’ केले?
शरद मिरे
भिवापूर : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने भिवापूर तालुक्याला धुवून काढले. नुकसानीचे पंचनामे झाले. भरपाईपोटी लागणाऱ्या एकूण रकमेची शासनाकडे मागणी केली. मात्र, दोन वर्षांनंतर केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकेचे शेतकरी मात्र अद्यापही वंचितच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेला मिळाले आणि आम्ही कोणते पाप केले, असा संतापजनक सवाल शेतकरी विचारत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त ठरलेल्या १,६९९ शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये शासनाकडे अद्यापही प्रलंबित आहेत. तालुक्यात दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे २,१९७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. प्राप्त अहवालाच्या आधारे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांना थेट न देता, त्यांच्या कर्ज खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेच्या पीक कर्ज दरानुसार (स्केल ऑफ फायनान्स) १ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत घेतलेल्या कर्जाची मुद्दल व त्यावरील ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची व्याजाची रक्कम अशा एकूण रकमेची कर्जमाफी देण्याबाबत निर्णय घेतला. शासनाने अतिवृष्टीची रक्कम सदर बँकेच्या कर्ज खात्यात टाकल्यानंतर कर्जाच्या शिल्लक रकमेचा भरणा शेतकऱ्यांना करायचा होता. आता या अतिवृष्टीला दोन वर्षांचा कालखंड उलटला आहे. मात्र, २,१९७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४९८ सभासद शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला असून १ कोटी ७२ लाख रुपये त्यांच्या पीक कर्जाच्या खात्यात टाकण्यात आले. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेच्या १,६९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत.
अशी आहे शेतकऱ्यांची संख्या
तालुक्यातील काही शेतकरी उमरेड तालुक्यातील बँकेचे खातेदार आहेत. बँकनिहाय वंचित शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बँक ऑफ इंडिया, भिवापूर- ३१९ शेतकरी, विदर्भ कोकण बँक, उमरेड- ५८, विदर्भ कोकण बँक, बेला- १, कॅनरा बँक, उमरेड- १५, बँक ऑफ इंडिया, कारगाव- २५७, स्टेट बँक, भिवापूर- १५१, युनियन बँक, उमरेड- ६५, युको बँक, सिर्सी- १७६, आयडीबीआय बँक, बेसुर- १२६, बँक ऑफ महाराष्ट्र, उमरेड -१४५, बँक ऑफ महाराष्ट्र, नांद- ३८६ असे एकूण ११ बँकांच्या १,६९९ खातेदार शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये प्रलंबित आहेत. केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत ४९८ शेतकऱ्यांना नुकसानीचे १ कोटी ७२ लाख रुपये पीककर्ज खात्यात देण्यात आले आहे.
-
जुलै, ऑगस्ट २०१९ मधील नुकसानीसंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रस्ताव सर्वप्रथम प्राप्त झाले. त्यांचे ऑडिट वेळेवर झाले. त्यामुळे शासनाकडून रक्कम वेळेत प्राप्त झाली. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रस्ताव उशिरा आल्याने रक्कम प्रलंबित आहेत.
-नरेश खोब्रागडे, सहायक निबंधक सहकारी संस्था, उमरेड