कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृती दल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:24+5:302021-05-13T04:08:24+5:30

अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी घेणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर ...

District Action Team for Children Orphaned by Corona () | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृती दल ()

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृती दल ()

अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे. कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर अशा बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, महिला व बालविकास उपायुक्त भागवत तांबे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सचिन जाधव, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, चाईल्ड लाईनच्या शहर समन्वयक श्रद्धा टल्लू आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. अशा बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार आहे. अशा निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून अशा बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व जिल्हा प्रशासन संरक्षणासोबतच समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास अशा बालकास बालगृहामध्ये दाखल करून घेण्यात येणार आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ यावरसुद्धा संपर्क साधता येईल. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या ०७१२-२५६९९१ यावर संपर्क साधावा. कोविड रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे बालगृहे, निरीक्षणगृहे यांच्यामार्फत तात्काळ उपचार पुरविण्यात येणार असून, यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकसुद्धा नियुक्त करण्यात येईल.

कोरोनामुळे अनाथ झालेली बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अशा बालकांची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला कळवावी. अशा बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

बॉक्स

एक शिशुगृह व एक बालगृह निश्चित

कोरोना संसर्ग झाल्यामुळे विलगीकरणात राहत असलेल्या तसेच दवाखान्यात दाखल केल्यामुळे बालकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अशा बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. अशा बालकांसाठी एक शिशुगृह तसेच १८ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती कोविड हॉस्पिटल व मदत केंद्रांनासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मदत उपलब्ध करून देणे सुलभ झाले आहे. अडचणीत सापडलेल्या पालकांबाबत संबंधित रुग्णालयाने तात्काळ माहिती कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Web Title: District Action Team for Children Orphaned by Corona ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.