विदर्भस्तरीय ‘ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारा’चे उद्या नागपुरात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 21:49 IST2023-03-24T19:31:07+5:302023-03-24T21:49:29+5:30
Nagpur News लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्काराचे शनिवारी, दि. २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता वितरण होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा राहतील.

विदर्भस्तरीय ‘ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारा’चे उद्या नागपुरात वितरण
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्काराचे शनिवारी, दि. २५ मार्च रोजी रामदासपेठेतील हाॅटेल सेंटर पॉइंटच्या पलासियो हॉलमध्ये दुपारी २ वाजता वितरण होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा राहतील. भारतीय जीवन बिमा निगम प्रायोजित या कार्यक्रमाला निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य मिळाले आहे.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापिका श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांचा दहावा स्मृतिदिन यानिमित्ताने हा लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजाविणाऱ्या महिलांना ‘ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात येईल.
‘महिला मुख्यमंत्र्यासाठी महाराष्ट्राला आणखी किती दिवस प्रतीक्षा?’ विषयावर परिचर्चा
आजवर देशातील अनेक राज्यांनी महिला मुख्यमंत्री पाहिले. विकासाचा झंझावातही पाहिला. प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती महाराष्ट्रानेच दिल्या; पण राज्याला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाहीत. नेमका हाच विषय ‘लोकमत’च्या व्यासपीठावर चर्चिला जाणार आहे. पुरस्कार वितरणानंतर होणाऱ्या ‘महिला मुख्यमंत्र्यासाठी महाराष्ट्राला आणखी किती दिवस प्रतीक्षा?’ या विषयावरील परिचर्चेत माजी महिला व बालकल्याणमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे, मुंबई जीएसटी सहआयुक्त निधी चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रुती तांबे सहभागी होणार आहेत.