जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५,२८७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:21 IST2018-06-15T00:21:04+5:302018-06-15T00:21:46+5:30
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५,२८७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे काम सुरू आहे. कर्जमाफी, एकरकमी कर्ज परतफेड व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अशा विविध घटकांचा लाभ दिला जात आहे. सन २०१७ मध्ये जिल्ह्यातील ५९४०१ शेतकऱ्यांनी कर्जमाफी व नवीन पीक कर्जाचा लाभ घेत शेतातील उत्पन्न प्राप्त केले होते. यावर्षी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सातबारावरील पीक कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खरीप हंगाम २०१८ अंतर्गत १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना १५ जूनपर्यत खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाचा लाभ मिळेल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.