जि. प. शाळा पडताहेत ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:43+5:302021-02-09T04:10:43+5:30
विजय नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : ग्रामीण भागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी गावागावात जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम करण्यात आले. जि.प. ...

जि. प. शाळा पडताहेत ओस
विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : ग्रामीण भागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी गावागावात जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम करण्यात आले. जि.प. शाळांनी अनेकांना घडविलेसुद्धा आहे. परंतु पालकांच्या इंग्रजी शिक्षणाच्या आकर्षणाने हल्ली जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. कळमेश्वर तालुक्यातील ९० पैकी तीन शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांअभावी अनेक शाळेच्या इमारती धूळ खात पडल्या आहेत.
तालुक्यात आठ केंद्रातून ८७ शाळांमध्ये शिक्षणाची सोय केलेली आहे. याकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त भव्यदिव्य इमारती उभारण्यात आल्या. यात पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून शौचालय, खेळण्याची साधने, डेक्स-बेंच आदींचा समावेश आहे. परंतु वाढत्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत गेला. यामुळे दिवसेंदिवस जि.प. शाळांची पटसंख्या घसरत गेली.
अनेक उच्च प्राथमिक शाळांची पटसंख्या लक्षात घेता, तेथे चाैथीपर्यंतच विद्यार्थी असल्याने प्राथमिक शाळेचे स्वरूप आले आहे. यामुळे ज्या गावात सातवीपर्यंत मोफत शिक्षण मिळण्याची सोय होती, त्या गावात आत फक्त चाैथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उरलेली आहे. परिणामी, अशा गावात अनेक जि.प. शाळेच्या इमारती विद्यार्थ्यांअभावी धूळ खात पडल्या आहेत. तर काही जुन्या कौलारू इमारती जीर्ण झाल्या असून, अशा शाळांच्या इमारतीत वा रिकाम्या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रिकाम्या जागेचा विधायक कामासाठी वापर व्हावा, असा सूर नागरिकात आळवला जात आहे.
...
जुन्या इमारतीचे पुनर्लेखन कधी?
विद्यार्थ्यांअभावी शाळेच्या इमारती रिकाम्या आहेत. परंतु गुणवत्तापूर्ण बांधकाम आहे, अशा ठिकाणी जिल्हा परिषदेने काॅन्व्हेंट सुरू करावे किंवा व्यायाम शाळा, वाचनालय आदी विधायक कामासाठी वापर करावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. जुन्या इमारतींचे पुनर्लेखन कधी असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या जुन्या जीर्ण काैलारू इमारती पाडून तेथे नागरिकांना विरंगुळा म्हणून उद्यान बांधून साैंदर्यीकरण करावे किंवा गावातील छाेटे-माेठे कार्यक्रम करण्यासाठी समाजभवन बांधावीत, अशी मागणी नागरिकांची आहे. तालुक्यातील गाेंडखैरी, धापेवाडा, सुसुंद्री, हरदाेली, माेहळी, वराेडा, खुमारी, तेलकामठी, वाढाेणा (बुद्रुक), सावळी (खुर्द) आदी गावातील शाळांच्या इमारती रिकाम्या आहेत.
....
यंदा पटसंख्या २७० ने कमी
मागील वर्षी जि.प. शाळांची पटसंख्या ३,६४२ इतकी हाेती. यंदा ती २७० ने कमी होऊन ३,३७२ एवढीच राहिली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळा धुरखेडा, खापरी (कारली), म्हसेपठार, सुसुंद्री, खापरी (उबगी), उबगी (जुनी), वाठोडा तसेच उच्च प्राथमिक शाळा खुमारी या आठ गावात दहाच्या खाली पटसंख्या आहे. आठ केंद्रांपैकी सेलू, तिष्टी, उपरवाही यांनी ५०० च्या वर पटसंख्या राखण्यात यश मिळविले आहे. आजही तालुक्यात उबाळी, लिंगा,उपरवाही, मांडवी, गोंडखैरी (जुनी) या शाळांनी १०० वर पटसंख्या कायम ठेवली आहे. तालुक्यात सर्वाधिक १८३ पटसंख्या राखण्याचा मान उच्च प्राथमिक शाळा उबाळीने मिळविला आहे.
....
संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन रिकाम्या शाळा ग्रामपंचायत प्रशासनाला हस्तांतरित करण्याची कारवाई करण्याबाबत मुख्याध्यापकांना सांगितले आहे.
- मंगला गजभिये, गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, कळमेश्वर
....
गावातील शाळांच्या रिकाम्या इमारती तसेच मोकळी मैदाने हस्तांतरित करून घेऊन तेथे गरजेनुसार व्यायामशाळा, वाचनालय व मोकळ्या मैदानावर बगीचा बनविण्यास प्राधान्य द्यावे.
- श्रावण भिंगारे, सभापती, पंचायत समिती, कळमेश्वर.