असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:13 AM2019-11-10T00:13:13+5:302019-11-10T00:14:26+5:30

विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

Dissatisfaction led to different chulas in the BSP | असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली

असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली

googlenewsNext
ठळक मुद्देदोन गट पडले : आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना विधानसभा निवडणुकीनंतर तत्काळ बडतर्फ करण्यात आल्यामुळे बसपातील असंतोष चव्हाट्यावर आला होता. साखरे यांच्यावर पक्षविरोधी कार्य करण्याचा आरोप लावण्यात आला होता. राज्य प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर प्रदेश, जिल्हा व तालुका कार्यकारिणी बर्खास्त करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. नवीन प्रदेशाध्यक्षाच्या घोषणेने त्यात आणखी तेल ओतले. त्यामुळे एका पदाधिकाऱ्याच्या समर्थकांनी राष्ट्रीय महासचिव वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजणे यांच्यावर पक्षाला विकण्याचा आरोप केला व त्या दोघांचे पुतळे जाळले. प्रत्युत्तरात या नेत्यांच्या समर्थकांनी आंदोलकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या वादातून पक्षात दोन गट पडले. परिणामी, वरिष्ठस्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षांतर्गतचा असंतोष शांत होण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाराज कार्यकर्त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्यावर हल्ला केला होता. तसेच, जूनमध्ये अ‍ॅड. ताजने यांना मारहाण केली होती. सध्याची स्थिती पाहता समर्थकांना मुंबईत बोलावून त्यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश केला जात आहे. दुसरीकडे नागपुरातील काही मोठे पदाधिकारी स्वत:ची ताकद कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. येणाºया दिवसांत जिल्ह्यातील पर्यटनस्थळी बैठका आयोजित केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मारहाणीची छायाचित्रे व्हायरल
अ‍ॅड. ताजने यांना अमरावती येथे मारहाण करताना काढण्यात आलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहेत. बसपातून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते त्यावर बोचणारे मतप्रदर्शन करीत आहेत. कार्यकर्त्यांचा मार बसलेल्या व्यक्तीलाच प्रदेशाध्यक्ष करण्याची प्रथा बसपामध्ये निर्माण झाली आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Dissatisfaction led to different chulas in the BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.