नासुप्रच्या भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त : ३४ वर्षांत दीड लाखाचे बनले पावणेचार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:44 IST2018-07-01T00:40:16+5:302018-07-01T00:44:07+5:30
भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नासुप्रच्या भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त : ३४ वर्षांत दीड लाखाचे बनले पावणेचार कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर दिगांबर डफाले (वय ६३, रा. अशोक नगर, कमाल चौक) आणि दीपेश दिलीपभाई कानाबार (वय ३३, रा. मातोश्री अपार्टमेंट, सतनामीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डफाले यांना १९८४ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासकडून सात हजार चौरस फुटाचा भूखंड लीजवर मिळाला होता. त्यावेळी डॉ. प्रकाश खूपचंद जैन (वय ७०, रा. धंतोली) यांच्यासोबत एक करारनामा करून डफाले यांनी डी. जे. एन्टरप्रायजेसच्या नावाने भागीदारी करून या भूखंडाचे मालकी हक्क जैन यांना देण्याचे ठरवले. बदल्यात नासुप्रमध्ये ७० हजार आणि डफाले यांना ७० हजार देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेतल्यानंतर या व्यवहारात वितुष्ट आले. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. तेथे न्यायप्रविष्ट असतानाच डफाले यांनी हा भूखंड टाईल्सचे व्यापारी दीपेश दिलीपभाई कानाबार यांना १७ आॅक्टोबर २०१६ ला ३ कोटी,८४ लाखांत विकला. विशेष म्हणजे, या भूखंडाचे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना कानाबार यांनी तो विकत घेतला. त्यामुळे डॉ. जैन यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक पराग फुलझेले यांनी या प्रकरणाची चौकशी केली. शुक्रवारी डॉ. जैन यांच्या तक्रारीवरून डफाले आणि कानाबार या दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गवई यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक झालेली नाही.