९४वे संमेलनाध्यक्ष म्हणून अनिल अवचटांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:50+5:302021-01-13T04:21:50+5:30
- मराठी साहित्य संमेलन : सासणे, वाघमारे, शोभणे यांचीही फिल्डिंग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या ...

९४वे संमेलनाध्यक्ष म्हणून अनिल अवचटांची चर्चा
- मराठी साहित्य संमेलन : सासणे, वाघमारे, शोभणे यांचीही फिल्डिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळी नावे पुढे येत असून, चर्चांचे रणांगण निनादू लागले आहे. प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार डॉ. अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
साहित्य महामंडळ आणि त्याअनुषंगाने होणारे साहित्य संमेलन ही कायम अग्नीची माळ असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. हेवेदावे, द्वेष-मत्सर, आरोप-प्रत्यारोपाचे बिगुल कायम वाजत राहण्याचे नावच साहित्य संमेलने होत, असेच म्हणावे लागेल. २४ जानेवारीला महामंडळाकडून संमेलनाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे आणि त्यासाठी घटकसंस्थांनी १२ जानेवारीपासून महामंडळाकडे इच्छुकांची नावे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी रोजी महामंडळाकडे ही नावे सर्व घटकसंस्थांकडून पोहोचतील. त्यानंतरच सर्वानुमते अथवा बहुमताने अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. मात्र, गुपित होणारा ही सर्व प्रक्रिया उघड करण्याचा मानस साहित्यक्षेत्राकडून व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने विविध पुस्तकांचे लेखक, व्यसनमुक्तीच्या कार्यात अग्रेसर आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकी डॉ. अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष करावे, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. त्यासाठी महामंडळाकडे पत्रही पाठविण्याचे आवाहन करणारी पोस्ट सोशल माध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध लेखक भारत सासणे, जनार्दन वाघमारे व डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावाची चर्चा होती. त्यात आणखी एका नावाची भर पडल्याने चर्चांचा फड रंगण्यास सुरुवात झाली आहे.
महामंडळ अध्यक्ष विवंचनेत!
महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील हे तसे धोरणी व हेकेखोर निर्णय घेणारे म्हणून साहित्यक्षेत्रात परिचित झाले आहेत. घुमान साहित्य संमेलनाचा वचपा काढण्यासाठी ते सज्ज असल्याच्या चर्चांना पेव फुटला आहे. अशा स्थितीत साहित्य वर्तुळातून नावांची चर्चा जाहीरपणे केली जात असल्याने ठाले-पाटील विवंचनेत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कुणालाच नावांची चर्चा करून संबंधित साहित्यिकांचा अपमान वा अतिरिक्त मान वाढवू नका, असे आवाहन केले आहे.
नागपुरातून अनेक नावांची एक पोस्ट व्हायरल
सोमवारीच नागपुरातून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात आतापर्यंत संमेलनाध्यक्ष न झालेले आणि झालेल्या अध्यक्षांपेक्षा कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या साहित्यिकांची नावे समाविष्ट आहेत. ऊठसूट कुणालाही संमेलनाध्यक्ष बनविण्यापेक्षा लायक व्यक्तीच्याच गळ्यात ती माळ पडावी, अशी अपेक्षा त्या पोस्टमध्ये व्यक्त केली गेली आहे.
.........