नागपुरातील पूनम अर्बन सोसायटीच्या संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:38 PM2019-12-10T23:38:21+5:302019-12-10T23:39:45+5:30

शेकडो ठेवीदारांना कोट्यवधींचा चुना लावून गोरगरिबांची ही रक्कम स्वत:च्या ऐशोआरामासाठी खर्च करणाऱ्या रेशीमबागेतील पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे फरार संचालक, आरोपी अरुण लक्ष्मणराव फलटणकर यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Director of Poonam Urban Society arrested in Nagpur | नागपुरातील पूनम अर्बन सोसायटीच्या संचालकास अटक

नागपुरातील पूनम अर्बन सोसायटीच्या संचालकास अटक

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : अफरातफरीच्या रकमेची चौकशी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेकडो ठेवीदारांना कोट्यवधींचा चुना लावून गोरगरिबांची ही रक्कम स्वत:च्या ऐशोआरामासाठी खर्च करणाऱ्या रेशीमबागेतील पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे फरार संचालक, आरोपी अरुण लक्ष्मणराव फलटणकर यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून सोसायटीच्या रकमेची कशी अफरातफर करण्यात आली, त्यांची व अन्य साथीदारांची भूमिका काय आहे, त्याचा पोलीस तपास करणार आहेत.
पूनम अर्बनच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाने शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करीत अनेकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल होणार नाही, याची जाण असूनही संचालक मंडळाने ही कर्ज प्रकरणे मंजूर करून रक्कम वाटली. अशा पद्धतीने सोसायटीतील रकमेची उधळपट्टी केली. गोरगरिबांच्या दैनिक वसुलीतून जमा झालेल्या रकमेचा संचालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अपहार केला. सोसायटी डबघाईस आल्यानंतर मात्र संचालकांनी हात वर केले. आपली रक्कम परत मिळत नसल्याने संचालकांनी अफरातफर केल्याचे ठेवीदारांच्या लक्षात आले. त्यामुळे ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. अनेक पीडितांच्यावतीने हर्षवर्धन श्रावणजी झंझाड यांची तक्रार नोंदवून घेत सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून अनेक संचालक फरार झाले. त्यांचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातर्फे शोध घेतला जात आहे. त्यातील अरूण लक्ष्मणराव फलटणकर हे सोमवारी रात्री पोलिसांच्या हाती लागले. या संबंधाने कुणाची तक्रार असेल किंवा आरोपींबाबत कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासकीय इमारत क्रमांक -१, सिव्हील लाईन, नागपूर किंवा पोलीस निरीक्षक, मीना जगताप यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Director of Poonam Urban Society arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.