मेळघाटमधील थायरॉईड शस्त्रक्रियेचे लंडन येथे थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 09:05 PM2020-02-05T21:05:20+5:302020-02-05T21:09:23+5:30

मेळघाट भागातील कोरकू लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गलगंड दिसून येतो.या वर्षी पहिल्यांदाच येथील शल्यक्रियेचे थेटप्रक्षेपण उपग्रहाच्यामदतीने लंडन येथील संत मेरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.

Direct transmission of thyroid surgery to London in Melghat | मेळघाटमधील थायरॉईड शस्त्रक्रियेचे लंडन येथे थेट प्रक्षेपण

मेळघाटमधील थायरॉईड शस्त्रक्रियेचे लंडन येथे थेट प्रक्षेपण

Next
ठळक मुद्देमोजक्या सोयीच्या मदतीने गुणवत्ताप्राप्त शस्त्रक्रिया पाहून लंडनचे डॉक्टर थक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थायरॉईड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. मेळघाट भागातील कोरकू लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गलगंड दिसून येतो. गलगंड एकदा झाला की त्यावर औषधोपचार नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे शस्त्रक्रिया. परंतु मेळघाटसारख्या दुर्गम भागात जिथे मूलभूत वैद्यकीय सोयी पुरेशा प्रमाणात पोहोचल्या नाहीत त्या ठिकाणी थायरॉईडची शस्त्रक्रिया करणे अशक्यच. परंतु रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथच्यावतीने व ‘थायरॉईड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. मदन कापरे यांच्या पुढाकाराने या अशक्याला शक्य केले. तब्बल १९ वर्षांपासून ते चिखलदरा भागात ‘थायरॉइड सर्जरी कॅम्प’चे आयोजन करून शेकडो रुग्णांना गलगंडपासून मुक्त करीत आहेत. शिबिरामधील शल्यक्रियेचे कौशल्य डॉक्टरांना आत्मसात करण्यासाठी कार्यशाळेचेही आयोजन केले जात असल्याने, डॉक्टरांनाही याचा फायदा होत आहे. या वर्षी पहिल्यांदाच येथील शल्यक्रियेचे थेटप्रक्षेपण उपग्रहाच्यामदतीने लंडन येथील संत मेरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. शिबिरात २०० स्क्वेअर फूटच्या जागेवर मोजक्याच सर्जिकल साहित्याच्या मदतीने एकाचवेळी दोन शस्त्रक्रिया सुरू असल्याचे पाहताना आणि त्याची गुणवत्ताही राखली जात असल्याचे पाहून लंडनच्या डॉक्टरांनी आश्चर्यव्यक्त केले. शस्त्रक्रियेच्या कौशल्याचेही कौतुक केले. 


रोटरी क्लब ऑफ नागपूर दक्षिणचे अध्यक्ष विजय सोनटक्के यांनी सांगितले, ‘थायरॉईड सर्जरी कॅम्प’सुरू करण्यापूर्वी गेल्या २८ वर्षांपासून मेळघाट परिसरात ‘जनरल सर्जिकल कॅम्प’चे आयोजन केले जात आहे. या दोन्ही शिबिराला वन विभाग, ‘थायरॉईड सोसायटी नागपूर’आणि ‘इंडियन सोसायटी ऑफ थायरॉईड सर्जन्स अ‍ॅण्ड फाऊंडेशन ऑफ हेड अ‍ॅण्ड नेक आँकोलॉजी’चे सहकार्य मिळत आहे. यावर्षी मेळघाट येथे आयोजित ‘जनरल सर्जिकल कॅम्प’मध्ये जवळपास एक हजार आदिवासीबांधवांना आरोग्यसेवेचा मोफत लाभ मिळाला. पहिल्या टप्प्यात धारणी येथे २१ ते २२ डिसेंबरपर्यंत व नंतर २७ ते २९ जानेवारीपर्यंत चिखलदरा येथे हा कॅम्प घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात शिबिरात ४७५ रुग्ण आले होते. त्यापैकी ३८ रुग्णांवर धारणी येथील शासकीय दवाखान्यात किरकोळ स्वरूपातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात चिखलदरा येथील शासकीय रुग्णालयात ९८३ रुग्ण आले होते. यातील ११५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील १२ रुग्णांवर सावंगी हॉस्पिटल वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

असे पोहोचतात रुग्णांपर्यंत
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे मेळघाटात १४० एकलव्य विद्यालय आहेत. येथील शिक्षकांचा संपर्क प्रत्येक गावात असल्यामुळे तेथील रुग्णांची माहिती त्यांना असते. रुग्णांची माहिती ते संस्थेपर्यंत पोहोचवितात. मग पुढील प्रक्रिया सुरू होते. वन विभाग या रुग्णांना त्यांच्या गावातून शिबिर व शस्त्रक्रियेच्या संस्थांपर्यंत घेऊन येतात. या कार्यात वनविभागाचे रामबाबू व नितीन कोकोडकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

मेळघाटातील दुर्गम भागातही थायरॉईडवर सुरक्षित शस्त्रक्रिया
डॉ. मदन कापरे यांनी सांगितले, १९ व्या वार्षिक थायरॉईड सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान मेळघाटातील दुर्गम भागातील चिखलदरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते. ‘गुरुकूल’ संकल्पनेतील या कार्यशाळेतून देशाच्या
कानाकोपऱ्यातून ४५ डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी थायरॉईड शस्त्रक्रियेमधील सूक्ष्म अतिसूक्ष्मतेबद्दल माहितीची देवाणघेवाण झाली. मेळघाटातील दुर्गम भागातही थायरॉईड विकारांवर सुरक्षित उपचार कसे करता येतात, याबाबत मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक करण्यात आले. यात थायरॉईडच्या १५ लाईव्ह शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याचे थेट प्रक्षेपण लंडन येथील सेंट मेरी इस्पितळात करण्यात आले होते. येथील थायरॉईड शस्त्रक्रियेचे प्राध्यापक डॉ. नील टॉले तर चिखलदरा येथील डॉ. अभिषेक वैद्य यांच्याशी समन्वय साधून होते. तेथील डॉक्टरांनी कार्यशाळेतील मोजक्या सर्जिकल साहित्याच्या मदतीने गुणवत्ता राखत गुंतागुंतीच्याा थायरॉईड शस्त्रक्रियेचे कौशल्य पाहूुन आश्चर्य व्यक्त केले.

 अ‍ॅपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाने लंडनचे डॉक्टर थक्क
बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विदुला कापरे यांनी सांगितले, मेळघाट येथे थायरॉईड सर्जिकल शिबिरात रुग्णांची संख्या मोठी असते. त्यातुलनेत साधने कमी असतात. यातच कमी वेळात जास्तीत जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी अ‍ॅपिड्युरल अ‍ॅनेस्थेशिया हे तंत्र विकसित केले. यात मानेच्या दोन मणक्यामध्ये इंजेक्शनच्या मदतीने औषध टाकून बधिरीकरण केले जाते. यामुळे जबड्यापासून ते छातीच्या वरपर्यंतचाच भाग बधिर होतो. परंतु हे करीत असताना मानेतून गेलेल्या हृदय, श्वसन नलिकेला धोका पोहचण्याची शक्यता असते. यामुळे अनुभव व कौशल्याच्या बळावरच ही प्रक्रिया यशस्वी होते. लाईव्ह शस्त्रक्रियेतून लंडनच्या डॉक्टरांनी अ‍ॅपिड्युरल अ‍ॅनेस्थेशिया तंत्र पाहताच ते थक्क झाले.

कार्यशाळेला यांचे मिळाले सहकार्य
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ईएनटी सर्जन डॉ. देवेंद्र माहोरो, डॉ. नीती कापरे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. तुळशीदास भिलावेकर, डॉ. साधना माहोरे, डॉ शुभा देशमुख, डॉ. कौस्तुभ पटेल, डॉ. अनिल कृझ, डॉ. देवेंद्र चाऊकर, डॉ. दीपक अब्राहम यांच्यासह रोटरी नागपूर दक्षिणचे विजय सोनटक्के, हेमंत मराठे, सतीश रायपुरे, मिलिंद पांडे, मिलिंद पाठक, शरद ठोंबरे, प्रकाश कापरे, हेमंत मराठे, संजय तत्त्ववादी, हेमंत शाह, अमित जोगी, अमित गोखले व विवेक गार्गे यांनी सहकार्य केले.

Web Title: Direct transmission of thyroid surgery to London in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.