अग्निवीरांसाठी मानकापूर स्टेडियमपर्यंत थेट बससेवा; ३४०० उमेदवार सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 15:10 IST2022-09-19T15:09:08+5:302022-09-19T15:10:13+5:30
आज चंद्रपुरातील उमेदवारांची चाचणी

अग्निवीरांसाठी मानकापूर स्टेडियमपर्यंत थेट बससेवा; ३४०० उमेदवार सहभागी होणार
नागपूर : नागपुरात विदर्भातील पहिल्या अग्निवीरांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून येणाऱ्या उमेदवारांना मानकापूर स्टेडियमपर्यंत पोहाेचता यावे, यासाठी थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन व बस स्टेशनवरून या बसेस थेट मानकापूर स्टेडियमपर्यंत जातात.
विदर्भातील पहिल्या ‘अग्निवीर’ सैन्य भरती निवड प्रक्रियेला मानकापूर क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली आहे. विदर्भातील नागपूरसह अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमधून ६० हजार उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार आहेत. गोंदिया गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांची चाचणी प्रक्रिया पार पडली आहे. सोमवारी चंद्रपुरातील ३४०० उमेदवारांची चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उमेदवार या चाचणीसाठी येत आहेत. ही निवड चाचणी रात्री १२ वाजेनंतर होत असल्याने या उमेदवारांना मानकापूर क्रीडा संकुल स्टेडियमपर्यंत थेट पोहोचता यावे यासाठी शहर बससेवेने थेट बससेवा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्टेशन व मध्यवर्ती बसस्थानक येथून ५-५ बसेस सोडली जात आहेत. ही सेवा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. मानकापूर स्टेडियमपर्यंत सोडणे आणि तेथून रेल्वे स्टेशन व बसस्थानकापर्यंत आणणे अशी दोन्ही बाजूंनी ही सेवा आहे. बसचे शुल्कही माफक ठेवण्यात आले आहे.
यासोबतच स्टेडियम परिसरात चार इलेक्ट्रिक बसेससुद्धा नि:शुल्क सेवा देत आहेत. एकेका राउंडनंतर उमेदवारांना मैदानापर्यंत पोहोचवणे व परत आणण्याचे काम या इलेक्ट्रिक बसेस स्टेडियम परिसरात करीत आहेत.