नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी गांधीबाग, सुतमार्केटमधील ७० वर्षे जुन्या दोन मजली इमारतीचा जीर्ण झालेला भाग पाडला. गांधीबाग झोनच्या वतीने इमारतीच्या मालक खुर्शिदा बेगम मो. शफी यांना २४ जून २०२१ रोजी नोटीस जारी करण्यात आली होती. पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचा दक्षिण-पूर्वेकडील भाग अतिशय जीर्ण झाला होता. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे कोणत्याही दिवशी अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे शुक्रवारी कारवाई करण्यात आली. शनिवारीही कारवाई सुरू राहणार आहे. दुसऱ्या पथकाने धरमपेठ झोनअंतर्गत आकाशवाणी चौकात सीझन लॉनच्या समोरील फूटपाथसह एका दुकानाचे शेड हटविले. त्यानंतर गोकुळपेठ बाजार ते रामनगर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फूटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे, नितीन निंबुलकर, राहुल रोकडे, भास्कर मालवे, सुनील बावणे आणि पथकाने पार पाडली.
.....................