धर्मापुरी-सिरसाेली मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:41+5:302020-12-26T04:08:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : रेतीच्या विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतुकीमुळे धर्मापुरी-तांडा-सिरसाेली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या ...

Dharmapuri-Sirsaeli road in a pit | धर्मापुरी-सिरसाेली मार्ग खड्ड्यात

धर्मापुरी-सिरसाेली मार्ग खड्ड्यात

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : रेतीच्या विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतुकीमुळे धर्मापुरी-तांडा-सिरसाेली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे एकीकडे अपघाताची शक्यता बळावली असून, दुसरीकडे वाहनांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे या मार्गावरील रेतीची वाहतूक कायम बंद करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हा खड्डेमय मार्ग सध्या पायी चालण्याच्या लायकीचा राहिला नाही. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचा वाहनांवरील ताबा सुटत असल्याने तसेच राेडवरील गिट्टीमुळे वाहने स्लीप हाेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पाऊस काेसळल्यास या संपूर्ण मार्गाला डबक्यांचे स्वरूप प्राप्त हाेते. शिवाय, रात्रीच्यावेळी वाहनचालकांला या खड्ड्यांची खाेली व रुंदी लक्षात येत नसल्याने हे खड्डे धाेकादायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी तसेच या मार्गावरील रेतीची वाहतूक कायमची बंद करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख यांच्यासह नागरिकांनी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य स्वप्निल श्रावणकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर मेहर, राजू भिवगडे, राजू मदनकर, दामोदर वालदे यांच्यासह सिरसाेली, तांडा, माेरगाव, धर्मापुरी येथील नागरिकांचा समावेश हाेता.

....

रेतीचा अवैध उपसा सुरूच

सिरसाेली (ता. माैदा) शिवारातून सूर नदी वाहते. जिल्ह्यात काेणत्याही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना या नदीवरील सिरसाेली घाटातून राेज माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. ही रेती सिरसाेली-तांडा- धर्मापुरी मार्गाने वाहून नेली जाते. या मार्गावरून सिरसोली, तांडा, मोरगाव येथील विद्यार्थी धर्मापुरी येथील शाळेत सायकलने ये-जा करतात. रेती वाहतुकीची वाहने भरधाव जातात. राेडवरील खड्डे व वाहनांचा वेग विद्यार्थ्यांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकताे. दुसरीकडे, गस्तीदरम्यान रेतीचा उपसा अथवा वाहतूक आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती अराेली (ता. माैदा)चे ठाणेदार विवेक साेनवणे यांनी दिली.

Web Title: Dharmapuri-Sirsaeli road in a pit