Devendra Fadnavis: मोदींमुळेच 'समृद्धी' महामार्गाचं स्वप्न पूर्ण झालं, नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 12:03 IST2022-12-11T12:03:12+5:302022-12-11T12:03:50+5:30
मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं.

Devendra Fadnavis: मोदींमुळेच 'समृद्धी' महामार्गाचं स्वप्न पूर्ण झालं, नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
नागपूर-
मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. २० वर्षांपूर्वीच या महामार्गाचं स्वप्न पाहिलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जर नसते तर हे स्वप्न पूर्णच होऊ शकलं नसतं, अशी भावना यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली.
"समृद्धी महामार्गाचं उदघाटन आम्हाला तुमच्याच हस्ते करायचं होतं. २० वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं आणि तुम्ही जर आमच्या पाठिशी ठामपणे उभे नसता तर हे स्वप्न पूर्णच झालं नसतं. तुम्ही ताकद दिली, पाठिंबा दिला त्यामुळे आज हे होऊ शकलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी या प्रकल्पाचं काम पाहात होते. ते अगदी पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत राहिले. त्यामुळेच इतक्या विक्रमी वेळेत काम पूर्ण होऊ शकलं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
...ते एक इंचही जमीन देऊ नका सांगत होते
"एका बाजूला मंत्री म्हणून एकनाथ शिंदे या महामार्गासाठी मेहनत घेत होते. स्वत: लोकांकडे जाऊन सह्या घेत होते. तर त्यावेळीचे त्यांचे नेते मात्र महामार्गाला विरोध करत होते. एक इंचही जमीन देऊ नका असं सांगत होते. सभा घेत होते. ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेऊन एक इंचही जमीन देऊ नका सांगितलं. त्याच ठिकाणी स्वत: शिंदेंनी जाऊन १५ दिवसात सर्वांच्या सह्या घेतल्या. अवघ्या ९ महिन्यात संपूर्ण ७०० किमी महामार्गासाठीच्या जमिनीचं अधिग्रहण आम्ही केलं", असं फडणवीस म्हणाले.