कोट्यवधींचे बिल अडकल्यामुळे रेल्वेत विकासकामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST2020-12-13T04:25:26+5:302020-12-13T04:25:26+5:30
अधिकारी घेत नाहीत दखल : कंत्राटदारांना आर्थिक टंचाई आनंद शर्मा नागपूर : कोरोनामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ...

कोट्यवधींचे बिल अडकल्यामुळे रेल्वेत विकासकामे ठप्प
अधिकारी घेत नाहीत दखल : कंत्राटदारांना आर्थिक टंचाई
आनंद शर्मा
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परंतु आता विकास कामांवरही त्याचा प्रभाव पडताना दिसत आहे. रेल्वेतील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले अडकून पडल्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई जाणवत आहे. यामुळे विकास कामेही ठप्प होत आहेत. कंत्राटदारांच्या मते रेल्वेचे अधिकारीही याबाबत दखल घेत नाहीत. बिल देण्यासाठी भेदभावपूर्ण वागणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर प्रशासन हा आरोप मानण्यास तयार नाही. त्यांच्या मते बिलांचे वाटप नियमानुसार करण्यात येत आहे. याबाबत सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन नागपूर विभागाचे अध्यक्ष प्रकाश मुरेकर यांनी सांगीतले की, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात लहान-मोठे मिळून जवळपास १०० कंत्राटदार कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखभालीची कामे, रेल्वे रुळाची कामे, प्रवासी सुविधा, रेल्वेस्थानकावरील कामे केली जातात. परंतु मागील वर्षभरापासून त्यांना आर्थिक टंचाई जाणवत आहे. त्यांची कोट्यवधींची बिले अडकली आहेत. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लेखी निवेदन देऊनही काहीच होऊ शकले नाही. यावर चर्चा करण्यासाठी अधिकारी वेळ सुद्धा देत नाहीत. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाल्याचा दाखला देऊन ते कंत्राटदारांना टाळत आहेत. यामुळे विकासकामे पूर्ण होऊ शकत नाहीत. दरम्यान काही अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे काही कंत्राटदारांची बिले देण्यात आल्याची माहिती असोसिएशनला मिळाली आहे. यामुळे इतर कंत्राटदारात असंतोष पसरला आहे.
...........
बैठकीत ठरणार धोरण
‘कोट्यवधींची बिले अडकल्यामुळे कंत्राटदारात असंतोष पसरला आहे. याबाबत ते संतप्त होऊन आक्रमक होण्याचा विचार करीत आहेत. अशा स्थितीत धोरण ठरविण्यासाठी पुढील आठवड्यात असोसिएशनची बैठक बोलावण्यात आली आहे.’
- प्रकाश मुरेकर, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूर विभाग
बिलांचे वाटप नियमानुसार
‘कंत्राटदारांना बिलांचे वाटप नियमानुसार करण्यात येते. कोरोनामुळे कर्मचारी कमी आल्यामुळे यात थोडा विलंब झाला. परंतु सर्वांना बिले देण्यात येत आहेत.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
...........