गावाचा विकास हाच खरा देशाचा विकास

By Admin | Updated: December 2, 2014 00:33 IST2014-12-02T00:33:06+5:302014-12-02T00:33:06+5:30

गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल.

The development of the village is the development of a true country | गावाचा विकास हाच खरा देशाचा विकास

गावाचा विकास हाच खरा देशाचा विकास

जाहीर व्याख्यान : अण्णा हजारे यांचा विश्वास
नागपूर : गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल. प्रकृतीचे दोहण न करता होणारा विकास शाश्वत विकास होय, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त केला.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास नागपूर विभागातर्फे सोमवारी सायंकाळी रामगोपाल माहेश्वरी सभागृह सीताबर्डी येथे आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे होते. याप्रसंगी अण्णा हजारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अण्णा हजारे पुढे म्हणाले, प्रकृतीचे दोहण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण वाढले आहे. यातून वेगवेगळे आजार वाढत आहे. तापमान ५० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे समुद्राच्या काठांवर असलेली शहरे धोक्यात आली आहेत. त्यामुळेच महात्मा गांधीजींनी प्रकृतीचे रक्षण करा, गावाकडे चला असा संदेश दिला होता. त्यांच्या विचारांनी आम्ही कामाला सुरुवात केली. ज्या गावात बाराही महिने दुष्काळ राहत होता, तिथे प्रकृती रक्षणाचे काम हाती घेतले. पावसाचे पाणी अडविले, ते जमिनीत साचवले. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढली. एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले गाव आज वर्षभर पीक घेणारे बनले आहे. उमेश चौबे यांनी राजकारणावर प्रहार करीत भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असलेल्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचे सांगितले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगण सिद्धीचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा बेले यांनी गुरुवंदना सादर केली. सुमितकुमार ‘आतिष’ यांनी अण्णा हजारे यांच्यावर आधारित गीत सादर केले. शुभांगी रायलू यांनी संचालन केले. डॉ. गोपाल बेले यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
भ्रष्टाचारविरोधी लढ्यात स्वार्थी कार्यकर्ते नको
ग्राम विकास आणि भ्रष्टाचारविरोधी लढा लढायचा असेल तर कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी, समर्पणाने आणि त्याग करण्याच्या भावनेतून काम करण्याची गरज आहे. तुम्ही निष्कलंक असाल तरच तुमचा प्रभाव पडेल. त्यामुळे या लढ्यामध्ये स्वार्थी कार्यकर्ते नकोत, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Web Title: The development of the village is the development of a true country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.