नियतीने तोडलेल्या पंखांना हवे समाजाचे बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:06+5:302021-01-08T04:21:06+5:30

-भरारीचे स्वप्न बाळगणारा एमबीबीएस डॉक्टर अंथरुणावर अबोल - मातापिता जगताहेत निर्मळ हाक उराशी बाळगून (लोकमत मदतीचा हात) लोकमत न्यूज ...

Destiny's broken wings need the strength of society! | नियतीने तोडलेल्या पंखांना हवे समाजाचे बळ!

नियतीने तोडलेल्या पंखांना हवे समाजाचे बळ!

-भरारीचे स्वप्न बाळगणारा एमबीबीएस डॉक्टर अंथरुणावर अबोल

- मातापिता जगताहेत निर्मळ हाक उराशी बाळगून

(लोकमत मदतीचा हात)

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात स्वप्नांच्या पंखांवर स्वार होणाऱ्या युवकापुढे नियतीने एक वेगळाच डाव मांडला होता. एका रात्री तो निपचित पडला. काय झाले, कसे झाले अजूनही ठाऊक नाही. पाच वर्षापासून तो अंथरुणावर अबोल आहे. तो बोलेल, आई-बाबा अशी हाक मारेल आणि काय, कसे झाले ते तो सांगेल, या अपेक्षेने मातापिता जगत आहेत आणि त्याला जीवाच्या आकांताने जगवत आहेत. त्यांना आता आधार हवा, सामाजिक संवेदनेचा.

अहेरी येथील धर्मराव कृषी महाविद्यालयातील निवृत्ती शिक्षक भीमराव व माधुरी गावंडे यांचा मुलगा डॉ. अनुप गावंडे हा ३६ वर्षीय होतकरू तरुण एमबीबीएस करण्यासाठी २००४ मध्ये रशियाला गेला. शिक्षण पूर्ण करून तो २०१० मध्ये अहेरीला परत आला. सहा महिने नोकरीही केली आणि एमडीच्या करण्यासाठी तो लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये २०१२-१३ मध्ये दाखल झाला. सगळे व्यवस्थित सुरू होते. मुलगा डॉक्टर झाला आणि आणखी मोठा डॉक्टर होणार म्हणून आई-वडील आणि दोन बहिणींचा आनंद गगनात मावेनासा होता. मात्र, ७ ऑगस्ट २०१५ची ती काळरात्र सारेच बदलून गेली. रात्री ११.३० वाजता फोन आला, तुमचा मुलगा बेशुद्धावस्थेत सापडल्याचा. कसेबसे दुसऱ्या दिवशी लातूर गाठले तर अनुप कोमामध्ये होता. काय, कसे हे कुणीच सांगेना. अखेर त्याला घेऊन त्यांनी नागपूर गाठले. मेडिकल हॉस्पिटल आणि नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. ब्रेन हायपोब्झिक इन्जुरी झाली असून, ब्रेनचे टिश्यू नष्ट झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारासाठी शेती, दागिने आणि मुलासाठीच घेतलेले घरही विकले. पैसा संपला आणि पेन्शनच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. अपेक्षा एकच, मुलाच्या चेहऱ्यावरचे हसू पुन्हा एकदा बघता येतील आणि त्या रात्री काय घडले याचा छडा लागेल. हा सगळा वृत्तांत सांगताना आईच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या आणि वडील निर्धाराने गप्प बसले होते.

प्रकरणाची पोलिसात नोंदच नाही

ही एवढी मोठी घटना घडूनही लातूर पोलिसांनी या प्रकरणाची नोंदच केली नसल्याचा आरोप अनुपचे वडील भीमराव गावंडे यांनी लावला. वसतिगृहाच्या खोलीतील अनुपचे साहित्यही अद्यापपर्यंत दिले गेले नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अनुपचे वर्गमित्र आणि रूम पार्टनरही नेमके काय झाले, हे सांगत नाहीत. या संकटाच्या काळात ‘लोकमत’ने अनुपचा विषय सतत जागता ठेवला. मुलाला न्याय मिळण्याची अपेक्षा अजूनही आहे. केवळ तो बोलावा, हेच आमचे अखेरचे स्वप्न असल्याची भावना भीमराव गावंडे यांनी व्यक्त केली.

समाजाकडून मदतीची अपेक्षा

एक होतकरू तरूण अशा अवस्थेत अंथरूणावर खिळला आहे. त्याच्या उपचारावर मोठा खर्च येत आहे. अशा स्थितीत समाजाने आपली संवेदना दाखवावी आणि त्याच्या उपचारार्थ सहकार्य करावे, असे आवाहन करतो आहोत. जी काही मदत करता येईल ती मदत ‘भीमराव विष्णू गावंडे, खाते क्रमांक : ३६१४८२९६२२, आयएफएससी कोड : सीबीआयएन०२८४६१९’ या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा करण्याचे आवाहन केले जात आहे.

......

Web Title: Destiny's broken wings need the strength of society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.