लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या टी-२० सामन्यासाठी संपूर्ण पोलिस दल बंदोबस्तात व्यस्त आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाच गाफील असताना गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन खुनाच्या घटनांमुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली.
एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या युवकाने भरदिवसा घरात घुसून एका विद्यार्थिनीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गळफासाला लटकवून आत्महत्या असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी ३८ वर्षीय शेखर अजाबराव ढोरे याला अटक केली आहे. मृत तरुणीचे नाव प्राची हेमराज खापेकर (वय २३) असे आहे.
प्राची ही बी.ए.चे शिक्षण घेत असताना शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण घेत होती. तिच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ व भावजय आहेत. वडील रेल्वेतून सेवानिवृत्त झाले असून, भाऊ व आई खासगी कंपनीत कार्यरत आहेत. आरोपी शेखर हा प्राचीच्या शेजारी राहतो. त्याची पत्नी कपड्यांचे शिवणकाम करते. पूर्वी प्राचीही शेखरच्या पत्नीसोबत शिवणकाम करत होती. तिचे शेखरच्या घरी नियमित येणे-जाणे होते. याचाच फायदा घेत शेखरने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच प्राची व तिच्या कुटुंबीयांनी शेखरपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. प्राचीने शेखरच्या पत्नीसोबतचे कामही बंद केले, तरीही शेखरचा प्राचीवरील ओढ कमी झाली नाही. तो तिला बोलण्याची संधी शोधत राहायचा. मात्र, प्राचीने त्याला स्पष्टपणे दूर राहण्याची ताकीद दिली होती. त्यामुळे शेखर संतप्त होता.
मंगळवारी सकाळी भाऊ व भावजय कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजता आई-वडीलही बँकेत गेले. घरात प्राची एकटी होती. ही संधी साधून शेखर प्राचीच्या घरी आला. प्राचीने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने वाद झाला. रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबला, ती बेशुद्ध झाली. घाबरून शेखरने तिला फरफटत घराच्या पहिल्या मजल्यावर नेले आणि तिचे डोके जमिनीवर आपटले. यात प्राचीचा मृत्यू झाला. तिचा श्वास थांबल्याची खात्री झाल्यानंतर शेखरने ओढणीचा फास बनवून मृतदेह सिलिंग फॅनला लटकवला व फरार झाला.
सुमारे अर्ध्या तासानंतर प्राचीचे आई-वडील घरी परतले. मुख्य दरवाजा उघडा असल्याने ते आत गेले. टी-टेबलवर प्राचीचा मोबाइल दिसला व सामान विस्कळीत होते. त्यांनी प्राचीला हाक मारली. पहिल्या मजल्यावरील बेडरूम बंद असल्याने पुन्हा हाक मारली; प्रतिसाद न मिळाल्याने आरडाओरडा केला. शेजारीही जमा झाले. त्यांच्या मदतीने मागील दरवाजातून खोलीत प्रवेश केला असता, प्राची गळफासाला लटकलेली दिसली. कुटुंबीयांनी मानकापूर पोलिसांना माहिती दिली. प्राचीला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा संशय असल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मेयो रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट आढळले. हत्या उघडकीस झाले. शरीरावरही जखमांचे निशाण आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्प वेळेत बाहेरील व्यक्तीने घरात घुसून हत्या करणे अशक्य असल्याने पोलिसांचा संशय शेजारी शेखरवर गेला. त्याला मंगळवार रात्रीपासून चालण्यात अडचण होत होती. चौकशीत तो पाय मुरगळल्याचे सांगत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला; मात्र कडक चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या विकृत हट्टामुळे प्राचीला विनाकारण जीव गमवावा लागला.
Web Summary : Nagpur rocked by a daytime murder. A man, rejected by a woman he stalked, broke into her home and killed her. The accused has been arrested.
Web Summary : नागपुर में दिनदहाड़े हत्या से सनसनी। एकतरफा प्यार में पागल युवक ने युवती के घर में घुसकर उसकी हत्या कर दी। आरोपी गिरफ्तार।