उपजिल्हाधिकारी सहा महिन्यानंतरही रुजू नाही, कारवाई होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 00:23 IST2020-10-30T00:22:12+5:302020-10-30T00:23:16+5:30
Deputy Collector not in charge, Nagpur news बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश शासनाचे असताना सहा महिन्यानंतरही उपजिल्हाधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजूच झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन कोरोना काळात इतर अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. आतापर्यंत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उपजिल्हाधिकारी सहा महिन्यानंतरही रुजू नाही, कारवाई होणार का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश शासनाचे असताना सहा महिन्यानंतरही उपजिल्हाधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजूच झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन कोरोना काळात इतर अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. आतापर्यंत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या रिक्त जागी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळातच यांना नियुक्ती देण्यात आली. हे सर्व अधिकारी जुन्या सरकारच्या काळात मंत्र्याकडे असल्याचे सांगण्यात येते. या तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. यातील एक उपजिल्हाधिकारी जवळपास महिनाभरापूर्वी पूर्वी रुजू झाले. रुजू होताच त्यांना कोरोना झाला. तर दोन महिला उपजिल्हाधिकारी अद्याप रुजू झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांकडे कोरोनाचीसुद्धा जबाबदारी आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांचा इशाराही कुचकामी ठरल्याचे दिसून येते.
असाच प्रकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडला असता तर प्रशासनाची अशीच भूमिका असती का, असा प्रश्नही विचारला जात आहे. तेव्हा याबाबत प्रशासन आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.