उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साजरा केला 'कर्तव्यतत्पर' पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस
By योगेश पांडे | Updated: October 9, 2023 21:34 IST2023-10-09T21:33:36+5:302023-10-09T21:34:03+5:30
वाढदिवशी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची थोपटली पाठ

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साजरा केला 'कर्तव्यतत्पर' पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एरवी ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव व अगदी स्वत:चा तसेच कुटुंबियांचा वाढदिवस बाजुला ठेवून काम करावे लागते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सोमवारी आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. ड्युटीवर असताना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री सोमवारी नागपुरात होते व देवगिरी या शासकीय निवासस्थानी ते होते. तेथे सदर पोलीस ठाण्यातीर धीरज पंचभावे व अरविंद गेडेकर हे कर्तव्यावर तैनात होते. त्यांचा वाढदिवस असल्याची माहिती फडणवीस यांना मिळाली. त्यांनी दोघांनाही दालनात बोलावून घेतले व शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देवगिरीवर केक बोलविण्यात आला व दोन्ही कर्मचाऱ्यांना केक कापून भरविण्यात आला. या प्रसंगामुळे पोलीस कर्मचारीदेखील भारावले होते. यावेळी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने, सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय मेंढे उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी बंदोबस्तावर असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्रदेखील काढले.