महाअभियानाच्या पहिल्या दिवशी १८ वर्षांवरील लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:05 IST2021-06-22T00:05:10+5:302021-06-22T00:05:37+5:30
Deprived of vaccination above 18 years कोरोना संक्रमणामुळे काही महिन्यांपूवीं नागपुरात हाहाकार माजला होता. त्याच शहरात देशव्यापी लसीकरण महाअभियानाच्या पहिल्या दिवशी सोमवारी फक्त ११,२३१ लोकांना डोस देण्यात आले. लस उपलब्ध नसल्याचे कारण देत नागपुरात १८ वर्षांवरील लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. परंतु मंगळवारपासून १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होत आहे.

महाअभियानाच्या पहिल्या दिवशी १८ वर्षांवरील लसीकरणापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे काही महिन्यांपूवीं नागपुरात हाहाकार माजला होता. त्याच शहरात देशव्यापी लसीकरण महाअभियानाच्या पहिल्या दिवशी सोमवारी फक्त ११,२३१ लोकांना डोस देण्यात आले. लस उपलब्ध नसल्याचे कारण देत नागपुरात १८ वर्षांवरील लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. परंतु मंगळवारपासून १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात सोमवारी एकाच दिवशी २.१२ लाख डोस देण्यात आले. परंतु नागपुरात डोस उपलब्ध नसल्याचे सांगत फक्त ११ हजारांच्या आसपास डोस देण्यात आले. लसीकरणाशिवाय कोरोना संक्रमणावर मात करणे शक्य नाही. नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. परंतु यातील ५.६१ लाख लोकांनाच पहिला डोस देण्यात आला आहे. तर १ लाख ८८ हजार ८९८ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सोमवारी नागपुरात एकूण ११,२३१ डोसपैकी ८३९६ डोस ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात आले. दुसरीकडे नागपूर ग्रामीणमध्ये एकूण ९१९३ डोस देण्यात आले. यात ३० ते ४४ वयोगटातील ६७८३ नागरिकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे १८ ते ४४ वयोगटाचा समूह केंद्र सरकारने तयार केला आहे. परंतु राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटाचा नवीन समूह तयार केला आहे. गेल्या तीन दिवसांत या वयोगटातील २५,०९१ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. शहरातील १०५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. परंतु नागरिकांची संख्या विचारात घेता केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहराची ३० लाख लोकसंख्या विचारात घेता २० जूनपर्यंत १८.७० टक्के लोकांनाच डोस देण्यात आला. हा वेग फार कमी आहे. लसीचे डोस उपलब्ध करून केंद्रांची संख्या वाढवावी लागेल अन्यथा शहरात कोरोनाची तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. यातून सावरणे कठीण होईल.
आजपासून १८ वर्षांवरील लसीकरण : आयुक्त
राज्य सरकारच्या निर्देशानुसार ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील सर्वांना मंगळवारपासून लस दिली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. मनपाकडे ४० ते ४५ हजार डोस उपलब्ध आहेत. उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. सरकारकडून मिळणाऱ्या निर्देशानुसार लसीकरण होत आहे. शहरात १०५ केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.