डेंटलच्या १० जागा जाणार!
By Admin | Updated: July 12, 2014 02:21 IST2014-07-12T02:21:12+5:302014-07-12T02:21:12+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) बीडीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करण्यासाठी डेंटल कौंसिल आॅफ इंडियाने (डीसीआय) मागील वर्षी आपल्या निकषावर मंजुरी दिली.

डेंटलच्या १० जागा जाणार!
सुमेध वाघमारे नागपूर
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) बीडीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करण्यासाठी डेंटल कौंसिल आॅफ इंडियाने (डीसीआय) मागील वर्षी आपल्या निकषावर मंजुरी दिली. परंतु या वर्षी निकषाची पूर्तता झाली नसल्याचे आढळून आल्यावर आक्षेप घेत, आठवड्याभरात त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. मात्र, महिनाभराचा कालावधी होत असतानाही रिक्त जागा भरण्यास महाविद्यालयाला अपयश आल्याने वाढलेल्या दहा जागा हातून जाण्याची दाट शक्यता आहे.
नागपुरातील दंत महाविद्यालय हे मध्य भारतातील रु ग्णांसाठी आशेचा किरण आहे. त्यामुळे येथे दररोज किमान दीड हजार रुग्ण येतात. रु ग्णांची संख्या पाहता दंत चिकित्सकांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी केंद्र सरकारच्या वैद्यकीय मंत्रालयाकडे डिसेंबर महिन्यात पाठविला. या प्रस्तावावरून डीसीआयच्या द्विसदस्यीय समितीने जून महिन्यात महाविद्यालयाचा दौरा केला. यात महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, शिक्षक, ग्रंथालय, यंत्रसामुग्री, बाह्य व आंतर रु ग्ण विभागातल्या सुविधा, सक्षमता याची पाहणी केली, तसा अहवालही पाठविला. १९ जून रोजी पाठविलेला हा अहवाल २३ तारखेला दंत महाविद्यालयाला मिळाला. यात जुन्याच त्रुटींची पूर्तता न झाल्याचे निदर्शनास आणून आवश्यक यंत्र सामग्रीसह एक प्राध्यापक व तीन सहयोगी प्राध्यापक अशा चार रिक्त जागा आठवड्याभरात भरण्याचे निर्देश दिले.
दंत महाविद्यालयाला यंत्र सामग्रीची समस्या सोडविण्यास यश आले. रिक्त जागा भरण्याच्या मंजुरीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पत्र पाठविले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी याला मंजुरी मिळाली. यामुळे महाविद्यालयाने रिक्त जागा लवकरच भरण्यात येईल, असे हमीपत्र डीसीआयकडे पाठविले. परंतु या वर्षी डीसीआय हमीपत्रावर मानणार नसल्याची माहिती आहे. यामुळे यावर्षी बीडीएस अभ्यासक्रमांच्या ४० जागांवरच प्रवेश प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे.