नागपुरात आता डेंग्यूसदृश तापाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 21:07 IST2020-11-28T21:07:16+5:302020-11-28T21:07:37+5:30
Nagpur News health कोविडची दहशत कमी होत नाही तोच डेंग्यूसदृश तापाने पुन्हा एकदा उपराजधानी दहशतीत आली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

नागपुरात आता डेंग्यूसदृश तापाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडची दहशत कमी होत नाही तोच डेंग्यूसदृश तापाने पुन्हा एकदा उपराजधानी दहशतीत आली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटिव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने खासगी इस्पितळांतील डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहेत. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्याही मोठी आहे.
उपराजधानीत गेल्या सात वर्षांत मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू या रोगाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाली आहे. शहरात २०१२ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. २०१८ मध्ये ५४३, २०१९ मध्ये ४५३ तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२० पर्यंत ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सात वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व वातावरणात झालेल्या बदलांमुळे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगीमध्ये मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहेत. डेंग्यूसदृश रुग्णाची लक्षणे ही कोरोनाशी मिळती जुळती असतात. यामुळे या रुग्णांची कोरोनासोबतच डेंग्यूची चाचणी केली जात आहे. परंतु बहुसंख्य चाचण्या निगेटिव्ह येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-रुग्णांची माहिती देणे अनिवार्य
खासगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आढळून आला त्याची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाच्या काळात आधीच या रुग्णांची विशेष माहिती भरून द्यावी लागत असल्याने, डेंग्यूची माहिती देण्यास काही रुग्णालये टाळत असल्याचेही समोर आले आहे.
डेंग्यूची लक्षणे
-एकदम जोराचा ताप चढणे
-डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
-डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
-स्नायू आणि सांध्यांमधे वेदना
-चव आणि भूक नष्ट होणे
-छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
-मळमळणे आणि उलट्या होणे
-त्वचेवर व्रण उठणे