प्रात्यक्षिकांच्या ‘टेक्निक’चे ‘ऑनलाइन’मुळे गणित बिघडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:15 IST2021-02-18T04:15:28+5:302021-02-18T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप वाढत असताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमधील तणाव ...

Demonstration ‘technique’ of ‘online’ spoils math? | प्रात्यक्षिकांच्या ‘टेक्निक’चे ‘ऑनलाइन’मुळे गणित बिघडले?

प्रात्यक्षिकांच्या ‘टेक्निक’चे ‘ऑनलाइन’मुळे गणित बिघडले?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप वाढत असताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमधील तणाव वाढत आहे. प्रवेशानंतर ‘ऑनलाइन’ शिक्षणच झाल्याने अनेक तांत्रिक मुद्दे त्यांना हवे तसे समजलेले नाहीत. शिवाय प्रवेश प्रक्रिया उशिरा संपल्यानंतर आता मार्च महिन्यात परीक्षा आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार कसा? अशी चिंता त्यांना सतावते आहे.

‘पॉलिटेक्निक’च्या बहुतांश अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांचे मोठे महत्त्व आहे. प्रत्यक्ष निरीक्षण व त्यानंतर स्वत: प्रयोग केल्यानंतर मुद्दा योग्य पद्धतीने समजतो. मात्र ‘कोरोना’मुळे अभ्यास ‘ऑनलाइन’ पद्धतीनेच झाला. अनेक विषयांतील प्रात्यक्षिके अद्यापही प्रलंबितच आहेत. त्यातच पदविका अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून २ मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर प्रथम सत्राची परीक्षादेखील काही दिवसांनीच आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान प्राध्यापकांसमोर निर्माण झाले आहे.

वाढीस तासिकांचे नियोजन

अनेक विद्यार्थ्यांना विषयातील बारकावे अद्यापही समजलेले नाहीत. त्यातच परीक्षा काही आठवड्यांवर आली असल्याने अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल याची त्यांनादेखील चिंता आहे. अभ्यासक्रमात अद्यापही कपात झालेली नाही. त्यामुळे आता शिक्षकांकडून वाढीव तासिकांचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु ‘ऑनलाइन’ माध्यमातून वाढीव तासिकांना जास्त ‘डेटा’ लागणार आहे.

.............

प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच वर्ग सुरू झाले होते व ‘ऑनलाइन’ माध्यमातून शिक्षकांनी जास्तीतजास्त सखोलपणे विषय शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या निर्देशांचे पालन करत ‘कोरोना’ काळातदेखील विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. उरलेली प्रात्यक्षिके पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

- डॉ. मनोज डायगव्हाणे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

काय म्हणतात विद्यार्थी

- आमच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना जास्त महत्त्व आहे. ‘ऑनलाइन’ माध्यमातून ‘थिअरी’चे मुद्दे तर कळाले. मात्र प्रात्यक्षिकांचे नेमके काय? करावे ही चिंता आहे. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून करणार काय?

- यशोवर्धन तिवारी, विद्यार्थी, पॉलिटेक्निक डिप्लोमा

अभ्यासक्रमाची व्याप्तता व परीक्षेसाठी उरलेले दिवस लक्षात घेता विद्यार्थ्यांसमोर एक मोठे आव्हानच आहे. अभ्यासक्रमामध्ये कपात व्हायला हवी. अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळायला हवा, तेव्हाच परीक्षा व्हावी.

- दीक्षा पाटील, विद्यार्थिनी, पॉलिटेक्निक डिप्लोमा

Web Title: Demonstration ‘technique’ of ‘online’ spoils math?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.