चळवळीचे तत्त्वज्ञान गीतातून मांडले
By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:37:18+5:302014-08-18T00:37:18+5:30
आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत

चळवळीचे तत्त्वज्ञान गीतातून मांडले
नागपूर : आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत जगलेली माणसेच नाहीत, तर येणारी प्रत्येक पिढी वामनदादा याच नावाने संबोधत राहील. एक कुटुंबप्रमुख म्हणून महाकवी वामनदादा कर्डकांनी १९४३ ते २००४ या कालखंडात चळवळीवर ५ हजाराहून अधिक गीते लिहून चळवळीचे तत्त्वज्ञान समाजापुढे मांडले. कर्डक म्हणजे आंबेडकरी चळवळीचा तपशिलवार लेखाजोखाच होते, असे मत वामनदादांच्या लोक गीतांचे गाढे अभ्यासक व चिंतक प्रा. डॉ. सागर जाधव यांनी व्यक्त केले.
निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकरी चळवळीत वामनदादांचे योगदान’ या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला मुख्य वक्ते म्हणून प्रा. डॉ. सागर जाधव उपस्थित होते.
यावेळी मंचावर अमर रामटेके, इंजि. राहुल दहीकर, शामराव हाडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सागर जाधव यांनी महाकवी वामनदादा यांच्या काव्यांवर पीएच.डी. केली आहे. वामनदादा अशिक्षित माणूस. मात्र बाबासाहेबांच्या कार्याचे प्रचंड आकर्षण. बाबासाहेबांनी सांगितले, आपले सामर्थ्य आणि कर्तृत्व सिद्ध करणारी लेखणी आणि वाणी ही दोन महत्त्वाची शस्त्र आहेत आणि वामनदादांनी तेच लक्षात ठेवले.
बाबासाहेबांच्या चळवळीत ते जगले. त्यांनी आंदोलन भोगले आणि यातून त्यांच्या लेखणीला शब्द फुटले. त्यांनी चळवळीच्या विविध अंगावर रचलेली गीत, काव्य आणि गझलेतून चळवळीला अतिशय व्यापक केले.
१९५१ च्या नायगावच्या सभेत बाबासाहेबांकडून त्याला शाब्बासकी मिळाली. ही कौतुकाची थाप त्यांना स्फूर्ती देऊन गेली. यातून त्यांनी ५००० गीते रचली.
त्यामुळेच आंबेडकरी चळवळीचा माणूस बाबासाहेबांनंतर वामनदादांना अभिवादन करतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी काव्यधारेचेही आयोजन करण्यात आले होते. यात अमर रामटेके, जगदीश राऊत, दिगांबर चनकापुरे, प्रकाश कांबळे, सुरेश वंजारी आदींनी काव्यवाचन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)