अपंगानी रेटून धरल्या मागण्या
By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-09T00:56:37+5:302014-12-09T00:56:37+5:30
विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या न्याय मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा धडकविण्यात आला. जोरदार नारेबाजी करून अपंग

अपंगानी रेटून धरल्या मागण्या
विदर्भ विकलांग संघर्ष समिती : अपंगांसाठी स्पर्धा परीक्षा रद्द कराव्या
नागपूर : विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या न्याय मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा धडकविण्यात आला. जोरदार नारेबाजी करून अपंग बांधवांनी आपल्या मागण्या रेटुन धरल्या. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अपंग बांधवांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अपंगांच्या मागण्या मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतू केवळ आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे अपंग बांधवांनी कडाक्याच्या थंडीत रात्री अपंग बांधवांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले.
नेतृत्व : गिरीधर भजभुजे, दादा मिरे, नामदेव बलगर, गोपीनाथ बहोत
मागण्या :
शासकीय, निमशासकीय भरतीत अपंगांसाठी स्पर्धा परिक्षा रद्द कराव्या
गटई कामगारांप्रमाणे अपंगांना स्टॉल द्यावेत
राशनिंग कृती समिती, रेल्वेच्या समितीवर अपंगांची नेमणूक करावी
अनुकंपाधारकांना त्वरीत नोकरीत सामावून अपंगांना व्यवसायासाठी ५ लाखाचे कर्ज द्यावे
अअपंगांना २०० चौरसफूट जागा व्यवसायासाठी आणि १५०० चौरसफूट जागा निवासासाठी द्यावी
अपंगांना वीज बीलात ५० टक्के सवलत द्यावी
अपंगांसाठी अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करावा.
अपंगांनी घालविली थंडीत उघड्यावर रात्र
नशिबाने अपंगत्व आले. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे अपंग बांधवांपुढे संकट उभे राहिले. शासनाकडून सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मागील २० वर्षे लढा दिला, परंतु पदरात काहीच पडले नाही. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तोडगा निघेल म्हणून त्यांनी मोर्चा काढला. परंतु एकही मागणी पदरात न पडल्यामुळे त्यांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर रात्र काढण्याची पाळी आली आहे. विदर्भ विकलांग संघर्ष समितीतील अपंगबांधव दरवर्षी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढतात. परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच सवड नसते. सध्या सुरू झालेल्या अधिवेशनातही त्यांनी मोर्चा काढला आहे. टेकडी मार्गावरील माहेश्वरी भवनाजवळ त्यांचा मोर्चा अडविण्यात आला. अपंगबांधव विधानभवनाकडे जात असताना त्यांना लाकडी कठडे लावून रोखून धरण्यात आले. अपंगबांधवांनी नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. दिवसभर त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यांची खरी परीक्षा झाली ती सायंकाळच्या सुमारास. हळूहळू थंडी पडू लागली आणि रस्त्यावर उघडे झोपण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्यावर काही अपंगबांधवांनी घरून पांघरण्यासाठी ब्लँकेट आणले. दुपारी सोबत आणलेली खिचडी खाऊन अपंगबांधवांनी कडाक्याच्या थंडीत उघड्यावर रात्र घालविली. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.