लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे 'वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प' योजनेअंतर्गत वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द जलाशयातून पाणी उचलून बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणापर्यंत एकूण ४२६ कि.मी. लांबीचा कालवा असणार आहे. या प्रकल्पात विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिद्ध असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
या विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ७१ हजार २७७ हे. क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या भागातील भूजल पातळी ही ८०० फुटापेक्षा खाली गेल्यामुळे या क्षेत्रास डार्क झोन संबोधिल्या जाते. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात येत होती. पाण्याअभावी संत्रा व मोसंबी बागा वाळत असून लागवडीचे क्षेत्रफळसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेत विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिद्ध असलेल्या आणि सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे या भागाचा "वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प" मध्ये समावेश करावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.