माजी वित्त राज्यमंत्र्यांच्या नावाने पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:17+5:302021-02-13T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबूक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या ...

माजी वित्त राज्यमंत्र्यांच्या नावाने पैशाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबूक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली. ‘साहेबांकडून अगदीच किरकोळ रकमेची मागणी झाल्याने चाट पडलेल्या कार्यकर्त्याने थेट साहेबांनाच विचारणा केल्यामुळे ही बनवाबनवी उघड झाली. त्याचमुळे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले.
माजी राज्यमंत्री मुळक सध्या नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कायकर्ते आबिद काजी यांना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास फेसबूकवरून एक मेसेज आला. १० हजारांची अत्यंत गरज आहे, तातडीने गुगल पे वरून पाठवा, असे म्हणत पैशाची मागणी करणाऱ्याने आपला गुगल पे चा मोबाइल नंबरही काजी यांना पाठविला. पैशाची निकड कुणालाही भासू शकते. मात्र, ‘साहेबांकडून’ अगदीच किरकोळ रक्कम मागितली गेल्याने काजी चाट पडले. त्यात मोबाइल क्रमांकही मुळक यांचा नव्हता. त्यामुळे काजींनी थेट मुळक यांच्या बंगल्यावर त्यांचे निकटस्थ प्रकाश नारायण बारोकर यांना फोन करून या संबंधाने विचारणा केली. नंतर मुळक यांच्याशीही बोलणी केली. त्यानंतर हा प्रकार सायबर गुन्हेगारीचा असल्याचे आणि मुळक यांचे फेसबूक अकाउंट हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. मुळक यांनी लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी आबिद काजी यांची प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ५११ तसेच माहिती व तंत्रज्ञानाचे सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला.
क्लोनिंगचा संशय
सायबर गुन्हेगाराने मुळक यांचे फेसबूक अकाउंट हॅक केले की अकाउंटचे क्लोनिंग केले त्याचा पोलीस तपास करीत आहेत. शहरात अशा प्रकारच्या महिनाभरात अनेक घटना घडल्या असून, खुद्द पोलीस आयुक्तांचेही फेसबूक अकाउंट हॅक करण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांनी मजल मारली आहे.